Gaurav More & Lakshmi Niwas Fame Shriniwas : ‘फिल्टपाड्याचा बच्चन’ गौरव मोरे सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. गौरवचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही वर्षांत विनोदाचं अचूक टायमिंग साधत अभिनेत्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आता गौरवची झलक प्रेक्षकांना ‘झी मराठी’ आगामी ‘गोविंदा आला रे’ या कार्यक्रमात सुद्धा पाहायला मिळणार आहे.
‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या १७ ऑगस्टला जन्माष्टमी विशेष ‘गोविंदा आला रे’ हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी वाहिनीवरील सगळे कलाकार एकत्र जमणार आहेत. या कार्यक्रमात विविध खेळांचं आयोजन केलं जाणार आहे. लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे या विशेष कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. यामध्ये सगळे कलाकार दोन टीम्समध्ये विभागले जातील. एक असेल लक्ष्मीची टीम आणि दुसरी असेल कमळी मालिकेतील कामिनीची टीम. आता या दोन टीममध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या सोहळ्याचा प्रोमो नुकताच वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. मात्र, या प्रोमोमध्ये एका खास गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लोकप्रिय अभिनेता गौरव मोरे ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील श्रीनिवासला खास भेट देणार आहे. आता ही भेट काय असेल जाणून घेऊयात…
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत श्रीनिवास आपल्या हक्काच्या घरासाठी दिवसरात्र मेहनत करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी लक्ष्मीच्या माहेरी लवकरच नवीन स्वत:च्या घर खरेदी करेन असा शब्द दिलेला असतो. पण, या वाटेत अनंत अडचणी येतात. कधी कोणी त्यांची फसवणूक करतं, तर कधी पोटच्या मुलांकडूनच त्यांना अपमान सहन करावा लागतो. एकंदर काय तर हक्काचं घर खरेदी करण्यासाठी श्रीनिवासला खूपच संघर्ष करावा लागतोय. गौरव आता जन्माष्टमीच्या कार्यक्रमाला श्रीनिवासचा संघर्ष कायमचा संपवून घराचा विषय END करून टाकणार आहे.
गौरवने रंगमंचावर सर्वांसमोर श्रीनिवासला घराची किल्ली भेट दिली आहे. गौरव म्हणतो, “आज मी सर्वांच्या साक्षीने तुमचा संघर्ष संपवणार आहे ही घ्या घराची किल्ली…” यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. अगदी लक्ष्मी सुद्धा मनसोक्त हसत असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

दरम्यान, ‘गोविंदा आला रे’ हा विशेष कार्यक्रम १७ ऑगस्टला दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता ‘झी मराठी’वर प्रसारित केला जाईल.