Zee Marathi Lakhat Ek Amcha Dada Actress Post : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘शिवा’ मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या पाठोपाठ आता वाहिनीवरील आणखी एक लोकप्रिय मालिका बंद होण्याची दाट शक्यता आहे. या मालिकेत महत्त्वपूर्ण साकारणाऱ्या अभिनेत्रीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘झी मराठी’ वाहिनीवर ८ जुलै २०२४ रोजी ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका सुरू झाली. यामध्ये लोकप्रिय अभिनेता नितीश चव्हाण सूर्या दादाची प्रमुख भूमिका साकारत आहे. त्याने साकारलेल्या सूर्या दादाच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. मात्र, यंदाच्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात या मालिकेला एकही नॉमिनेशन मिळालेलं नाहीये. यावरून अनेकांनी ही मालिका संपणार असल्याचा अंदाज बांधायला सुरुवात केली होती.
‘लाखात एक आमचा दादा’ ऑफ एअर होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच यामध्ये राजश्रीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ईशा संजयने शेअर केलेली पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
ईशाने या पोस्टला, “राजश्रीच्या भूमिकेसाठी शेवटचं तयार होताना…” असं कॅप्शन दिलं आहे. यासह ती म्हणते, “मन खूप भरून आलंय…आणि आता फक्त आठवणी कायमस्वरुपी जवळ राहणार आहेत. डोळ्यांत पाणी आहे अन् हात थंड पडलेत. १ वर्ष ५ महिने झाले…आता राजूच्या ( राजश्री ) भूमिकेतून तुमचा निरोप घेते. लाखात एक आमचा दादा… Signing Off As Raju”
ईशा संजयच्या ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका संपणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. आता ही मालिका संपणार की फक्त ईशा राजश्रीच्या भूमिकेतून एक्झिट घेणार हे लवकरच स्पष्ट होईल.
‘झी मराठी’ वाहिनीने ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका संपणार की नाही यावर अद्याप कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाहीये. लवकरच वाहिनीकडून अधिकृतरित्या याबद्दल माहिती जाईल. दरम्यान, सध्या ईशाच्या पोस्टवर सहकलाकारांसह तिच्या चाहत्यांनी भावनिक इमोजी शेअर करत आम्ही तुला मिस करू असं म्हटलं आहे.
दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ही मालिका ‘झी मराठी’वर सायंकाळी ६ वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये नितीश चव्हाण, मृण्मयी गोंधळेकर, गिरीश ओक, कोमल मोरे, राजश्री निकम, समृद्धी साळवी, जुई तनपुरे, ईशा संजय, मधुगंधा कुलकर्णी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.