Lakshmi Niwas Upcoming Twist: पत्रिकेत दोष असल्याने लग्न न ठरणाऱ्या भावनाला अनेकदा टोमणे सहन करावे लागत होते. तिच्या आई-वडिलांना तिच्या लग्नाची चिंता लागली होती. अशातच जेव्हा पत्रिकेत दोष असूनही श्रीकांतने भावनाबरोबर लग्न करण्याची तयारी दाखवली, तेव्हा लक्ष्मी व श्रीनिवासची चिंता काही प्रमाणात कमी झाली होती.
लक्ष्मी निवास या मालिकेतील भावनाच्या लग्नादिवशीच श्रीकांतचा मृत्यू झाला आणि भावना पुन्हा अविवाहित राहिली. या सगळ्यात श्रीकांतची मुलगी आनंदी तिच्या आयुष्यात आली. भावनानं तिचा मुलगी म्हणून स्वीकार केला; तर आनंदीनं तिला आईचं स्थान दिलं. आनंदी भावनाबरोबर राहू लागली. या सगळ्यात भावनाच्या आयुष्यात सिद्धू नावाचा मुलगा आला.
भावनाला पाहता क्षणीच सिद्धू तिच्या प्रेमात पडला होता. भावनाला मात्र सिद्धूचे वागणे अजिबात आवडत नव्हते. मात्र, पुढे अशा काही गोष्टी घडल्या की, ज्यामुळे भावना व सिद्धूचे लग्न झाले. त्यानंतर त्यांच्यात हळूहळू मैत्री होताना दिसली. आता भावना सिद्धूसमोर तिच्या भावना व्यक्त करणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, भावना व सिद्धू एका होडीत आहेत. पाण्यात कमळाची फुले पाहायला मिळत आहेत. सिद्धूच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे. भावना सिद्धूच्या डोळ्यांवरची पट्टी काढते.
आजूबाजूचा परिसर पाहून सिद्धू भावनाला विचारतो की, भावना मॅडम आपण कुठे आलो आहोत? ते ऐकून भावना त्याचा हात हातात घेत म्हणते, “मॅडम नाही; फक्त भावना म्हणायचं. सिद्धूची भावना. सिद्धीराज मला तुम्हाला त्वरित, तत्काळ ताबडतोब काहीतरी सांगायचं आहे. सिद्धू विचारतो, काय? त्यानंतर भावना उठते आणि दोन्ही हात पसरून मोठ्याने आय लव्ह यू सिद्धीराज. त्यानंतर तिचा तोल जात असताना सिद्धू तिला सावरतो आणि म्हणतो की, आय लव्ह यू टू भावना. पुढे तो मॅडम म्हणताना भावना त्याच्या तोंडावर हात ठेवते. भावनाने प्रेमाची कबुली दिल्याने सिद्धूच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. यादरम्यानस, ‘हलके हलके अलगुज हे मनी…’ हे गाणेदेखील ऐकायला मिळत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने लिहिले, अखेर मनातलं प्रेम ओठांवर येणार, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी म्हणाले…
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत कौतुकाचा वर्षाव केला आहे. “वाह! भावना सिद्धूला प्रपोज करणार. पण, हे स्वप्न वगैरे नको म्हणजे झालं”, “हे सिद्धूचं स्वप्न नाहीये ना?”, “किती गोड”, “मला तर हे स्वप्न असल्यासारखंच वाटत आहे”, “हा भाग पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे”, “बेस्ट”, “अखेर तो दिवस आलाच”, “आई शपथ, एक नंबर प्रोमो”, “माझ्या जीवाला शांती मिळाली’, “या ट्रॅकची मी वाट बघतोय”, “चला, गाडी रुळावर आली”, “फक्त हे स्वप्न नसायला नको”, “हे स्वप्न नसलं म्हणजे झालं”, “याची कधीपासून वाट बघत होतो”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.




दरम्यान, आता हे सिद्धू किंवा भावनाचं स्वप्न आहे की खरंच भावना सिद्धूला प्रपोज करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.