Lakshmi Niwas Upcoming Twist: ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतील लक्ष्मी व श्रीनिवासच्या कुटुंबात सतत काही ना काही घडत असल्याचे पाहायला मिळते. कधी भावनाच्या आयुष्यात वेगळे वळण येते, तर कधी जान्हवीला जयंतचा विकृतपणा सहन करावा लागतो.

अनेकदा हरीश व संतोष चुका करताना दिसतात, तर वेंकी सर्वांची मने जिंकतो. छोटी आनंदी तिच्या भावना आईवर खूप प्रेम करते, तर सिद्धू भावनाला त्यानेच तिच्या गळ्यात गुपचूप मंगळसूत्र घातले आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करतो. वीणा व सिंचना या लक्ष्मी व श्रीनिवासच्या सुना गुणी असल्याचे पाहायला मिळते, तर श्रीनिवासची आई लक्ष्मीला वेळोवेळी साथ देताना दिसते.

लक्ष्मी व श्रीनिवास दोघे मिळून सुखी भविष्याची स्वप्ने पाहत येणाऱ्या संकटांवर मात करतात. आता या मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत पुढे काय घडणार?

जान्हवीचा जवळचा मित्र विश्वा आणि जान्हवीचा नवरा जयंत समोरासमोर येणार आहेत. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, जयंत जान्हवीला सांगतो की मला ही मीटिंग जेवण करता करता करावी लागेल. आता पाहुणेसुद्धा येत आहेत, गेटजवळ असतील.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, जान्हवी-जयंतच्या घरासमोर एक गाडी थांबते. त्या गाडीतून विश्वा खाली उतरतो. विश्वा मोबाइलवर काहीतरी बघत असल्याचे दिसते. बागेत असलेली जान्हवी त्याला बघते. तिच्या चेहऱ्यावर भीतीदायक भाव दिसतात. विश्वा तिथून पुढे जातो. त्यानंतर विश्वा जयंतच्या दरवाजाबाहेर असल्याचे पाहायला मिळते. जयंत दरवाजा उघडतो. त्याला पाहताच विश्वा मनात म्हणतो, मी ज्यांच्याबरोबर बिझनेस करणार आहे ते जयंत कानिटकर आहेत? त्यानंतर ते दोघेही घरात जातात. जयंत जान्हवीला पाहुणे आल्याचे सांगतो. त्यावर जान्हवी मोठ्याने ओरडून बाहेर आले असे सांगते.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने जान्हवी व विश्वाची भेट होणार का? अशी कॅप्शन दिली आहे.

लक्ष्मी निवास मालिकेत दाखविल्याप्रमाणे, विश्वा हा जान्हवीचा चांगला मित्र होता. तो तिच्या प्रेमात पडला. ज्या दिवशी तो त्याच्या मनातील भावना सांगण्यासाठी जान्हवीकडे गेला, त्याच दिवशी जान्हवीने ती लग्न करत असल्याचे त्याला सांगितले. पुढे जान्हवीचे लग्न झाले. मात्र, प्रेमभंग झाल्याने विश्वाला त्या गोष्टीचा खूप त्रास झाल्याचे पाहायला मिळाले. याच दु:खात तो मद्यप्राशनदेखील करत होता.

दुसरीकडे जयंत जान्हवीवर खूप प्रेम करतो. मात्र, जान्हवीने फक्त त्याच्याकडेच लक्ष द्यावे, असा त्याचा अट्टाहास असतो. तसे नाही झाले तर तो तिला विकृत पद्धतीच्या शिक्षा देतो. त्याचा त्रास जान्हवीला होतो, त्यामुळे आता विश्वाचे जान्हवीवर प्रेम होते, हे सत्य जयंतसमोर येणार का? त्यानंतर तो काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.