Lakshmi Niwas Upcoming Twist: ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत सध्या जान्हवी, लक्ष्मी, व्येंकी, भावना, जयंत, सिद्धू यांच्या आयुष्यात विविध घटना घडताना दिसत आहेत. विविध घटनांमुळे त्यांच्या आयु्ष्यात मोठी उलथापालथ होत आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, जयंतच्या विकृतपणाबद्दल समजल्यानंतर, जयंतनेच आजीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचे समजल्यानंतर जान्हवीने त्याच्या आयुष्यातून जाण्यासाठी मोठे पाऊल उचलले.
गोव्याला फिरायला गेल्यानंतर जान्हवीने जयंतसमोरच समुद्रात उडी मारली. त्यानंतर जयंत व स्थानिक पोलिसांनी जान्हवीचा शोध घेतला, त्यांना ती सापडली नाही. त्यानंतर जयंतने तिच्या घरच्यांना येऊन तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सुरुवातीला दळवी कुटुंबाला धक्का बसला असला तरी हळूहळू हे सत्य हे कुटुंब स्वीकारताना दिसत आहे.
दुसरीकडे जान्हवी समुद्राच्या किनारी येऊन पडली होती. त्यावेळी तिची व विश्वाच्या वडिलांची भेट झाली. तिने त्यांचा अपघात होण्यापासून वाचवले. स्वत:चे नाव तनुजा असे सांगितले आणि खरी ओळख लपवली. हे तिने यासाठी केले, कारण तिला पुन्हा जयंतकडे जायचे नव्हते. ती सध्या विश्वाच्या घरी राहत आहे. असे असले तरी अद्याप विश्वा व जान्हवीची भेट झालेली नाही.
आता मात्र जान्हवी तिच्या घरी म्हणजेच दळवी कुटुंबात आली आहे, त्यामुळे तिची व लक्ष्मीची भेट होणार का, असा समोर आलेला प्रोमो पाहिल्यानंतर प्रश्न पडला आहे.
“त्या जयंतने तुझी जी काही अवस्था…”
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, जान्हवी चेहरा लपवत तिच्या घरी येते. दाराच्या फटीतून तिला तिचा फोटो दिसतो. त्या फोटोला हार घातलेला दिसतो. त्या फोटोसमोर वीणा दिसते. ती वीणाच्या नकळत घरात येते. आजीच्या खोलीत जाते. वीणाला कोणी घरात आले का असा प्रश्न पडतो.
दुसरीकडे जान्हवी तिच्या कोमात असलेल्या आजीच्या खोलीत जाते. तिच्या शेजारी बसते. तिला म्हणते, “ए आजी, त्या जयंतने तुझी जी काही अवस्था केली आहे त्यासाठी मी स्वत:ला कशी माफ करू?”, असे म्हणताना ती रडत असल्याचे दिसते. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की लक्ष्मीला जान्हवी आजूबाजूला असल्याचे भास होत आहेत. ती जानू अशी हाक मारते. पुढे लक्ष्मी स्वत:शीच म्हणते, “मला भास का होत आहेत”, असे म्हणताना तिच्या डोळ्यांतून पाणी येते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “माय लेकीची भेट अखेर होईल का?”, अशी कॅप्शन दिली आहे.
आता जान्हवी लक्ष्मीची भेट घेणार का? दळवी कुटुंबाला जान्हवी जिवंत असल्याचे सत्य समजणार का? मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
