Vallari Viraj and Aalapini Nisal Video: प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ येते, जेव्हा तो परिस्थितीपुढे हार मानतो. मग त्या परिस्थितीत प्रयत्न करण्याची त्याची मनस्थिती नसते. आपण प्रयत्न करूनही आपल्याला यश का मिळत नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. जर यश मिळणार नसेल, तर प्रयत्न करायचे कशाला, असेही अनेकांना वाटते.
अशा काळात माणसाला अशा एक मित्राची, मैत्रिणीची किंवा जवळच्या अशा एक व्यक्तीची गरज असते, जिचा आपल्यावर पूर्ण विश्वास असतो. ती व्यक्ती आपल्याला हार मानू देत नाही. कोणत्याही परिस्थितीत आशादायी ठेवणारी, आशा दाखवणारी, अंधारानंतर प्रकाश येणार आहे, असे सांगणारी मैत्रीण, मित्र किंवा एखादा नातेवाईक प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. आता अशाच एका संकल्पनेवर आधारित अभिनेत्री वल्लरी विराज व आलापिनी निसळ यांनी सुंदर सादरीकरण केले आहे.
वल्लरी विराज व आलापिनी निसळ या दोन्ही अभिनेत्री कायमच अशा अफलातून आणि वैविध्यपूर्ण, आशयपूर्ण सादरीकरणासाठी ओळखल्या जातात. काही वेळा निव्वळ मनोरंजन, काही वेळा सुंदर सादरीकरण, एकापेक्षा एक अशा डान्स स्टेप्स, खिळवून ठेवणारे हावभाव आणि कधी सादरीकरणातून संदेश देणारे त्यांचे व्हिडीओ सोशल मीडिययावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात.
हिंदी-मराठी जुन्या आणि नवीन गाण्यांवर वल्लरी व आलापिनी ताल धरताना दिसतात. आता वल्लरीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. मांजा या गाण्यावर त्यांनी सादरीकरण केले आहे.
वल्लरी विराज व आलापिनी निसळ यांनी शेअर केला व्हिडीओ
व्हिडीओमध्ये दिसते की, परीक्षेत अपयश मिळाल्यामुळे एक मैत्रीण हार मानते. मी प्रयत्न करूनही मला यश मिळाले नाही. तर मी पुन्हा प्रयत्न कशाला करू? पण, तिची मैत्रीण तिला काहीतरी छान होईल. नशिबात काहीतरी चांगले लिहिले असेल, असे समजावते. पण, तरीही अपयश आलेली मैत्रीण तिचे म्हणणे मानायला तयार नसते; मात्र तिची मैत्रीण तिला समजावत राहते, तिला आशा दाखवते. शेवटी अपयश आलेली मैत्रीण तिच्यावर विश्वास ठेवते आणि पुन्हा तयारीला लागते, असे दिसते. एकही शब्द न बोलता, फक्त हावभावातून वल्लरी व आलापिनीने हा प्रेरणादायी संदेश या सादरीकरणातून दिला आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना वल्लरीने, ‘जेव्हा आपण स्वत:वर विश्वास ठेवत नसतो, तेव्हा जे आपल्यावर विश्वास ठेवतात अशा मित्र-मैत्रीणींसाठी’, अशी आशयात्मक कॅप्शन दिली आहे. तसेच व्हिडीओवर लिहिलेले दिसत आहे की, असे मित्र-मैत्रिणी जे तुम्हाला कधीही हार मानू देत नाहीत.
नेटकरी काय म्हणाले?
आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अभिनेत्री शीतल क्षीरसागर यांनी लिहिले की, वाह! विचार आणि हावभाव दोन्ही परफेक्ट आहेत. तसेच अनेक नेटकऱ्यांनीदेखील त्यांचे कौतुक केले आहे. “तुम्ही ज्या पद्धतीने रीलमधून संदेश देता, ते मला खूप आवडते.”, “ज्या पद्धतीने तुम्ही तुमचे विचार सांगता, ते खूप छान आहे”, “छान विचार. छान नृत्यदिग्दर्शन. छान जोडी. प्रत्येक वेळी तुम्ही अशी विचार करायला लावणारी गोष्ट घेऊन येता.”, “हो, मी हे तुमच्या मैत्रीमध्ये पाहू शकतो”, “कसं काय सुचतं तुम्हाला”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.





दरम्यान, आता वल्लरी व आलापिनी आगामी काळात कोणती नवीन संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.