Prapti Redkar on her role in Savalyachi Janu Savali: ‘सावळ्याची जणू सावली’ ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सावली, सारंग, भैरवी, तारा, ऐश्वर्या, तिलोत्तमा, जगन्नाथ, राजकुमार, अमृता, नील, अशी सगळीच पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. यातील काही पात्रे सकारात्मक तर काही नकारात्मक आहेत. पण, तरीही प्रत्येक कलाकाराची वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटते.

मालिकेतील सावली ही गरीब कुटुंबातील आहे. सावळ्या रंगाच्या सावलीला लहानपणापासून परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. तिला उत्तम गाता येते, तिचा आवाज चांगला आहे, पण तो आवाज तिची ओळख आजपर्यंत बनू शकला नाही; याचे कारण म्हणजे सावलीचा आवाज ऐकल्यानंतर भैरवी वझेने त्या आवाजाचा तिच्या मुलीसाठी फायदा करून घेतला.

भैरवीने सावलीला गायनाचे प्रशिक्षण दिले. पण, सावलीने ताराचा आवाज बनून कायम गात राहावे, त्या बदल्यात ती तिच्या कुटुंबाला व तिच्या लहान भावाच्या उपचारांसाठी आर्थिक मदत करेल, अशी अट ठेवण्यात आली; त्यामुळे तारा वझे ही गाणे गात असल्याचे नाटक करते, मात्र स्टेजमागून सावली गाणे गाते.

सावलीच्या आवाजामुळे तारा आज लोकप्रिय गायिका आहे. या सगळ्यात सावलीची विठ्ठलाप्रतिची भक्ती लक्ष वेधून घेते. संकटाच्या काळात किंवा मनात प्रश्न असताना सावली ज्या पद्धतीने विठ्ठलाला सांगते, त्याच्यावर विश्वास ठेवते, ते पाहून चाहते अनेकदा भारावून जातात.

“विठ्ठलाशी इतकं…”

सावली ही भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकरने साकारली आहे. लवकरच झी मराठी अवॉर्ड्स २०२५ पार पडणार आहे. या सोहळ्यादरम्यान व्हायफळ या पॉडकास्ट सेशनमध्ये प्राप्तीने हजेरी लावली होती. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये प्राप्तीला विचारण्यात येते की, विठ्ठलभक्ती तुझ्या पात्राचा एक महत्त्वाचा पैलू आहे, त्यातून वैयक्तिक पातळीवर काही शिकायला मिळालं का? यावर प्राप्ती म्हणाली, “पात्र साकारताना मी प्राप्ती म्हणून विठूरायाच्या खूप जवळ गेले, कारण मी कोकणातली आहे, तिथे गणेशोत्सव हा मोठा सण आहे, त्यामुळे विठ्ठलाशी इतकं नातं जोडलेलं नव्हतं.”

पुढे प्राप्ती म्हणाली, “सावलीचं पात्र साकारताना मला वारीमध्ये जाता आलं, तिथल्या लोकांना भेटता आलं, विठूरायाशी जोडली गेले. सावली या पात्रामुळे माझ्यात खूप संयम आला आहे, मी किकबॉक्सर आहे; तर सावलीमुळे मी थोडी नाजूक झाली आहे.” या व्हिडीओमध्ये पुढे सावली ‘कानडा राजा पंढरीचा’ या गाण्याच्या ओळी म्हणत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत काही दिवसांपूर्वी शिवानीची एन्ट्री झाली आहे. तिच्या येण्यामुळे सावली व सारंगच्या नात्यावर काही परिणाम होणार का आणि सावली या सगळ्याला कशी सामोरी जाणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.