Savalyachi Janu Savali upcoming twist: दोन लोकप्रिय मालिका एकत्र दिसत असतील, मालिकांचा महासंगम असेल तर प्रेक्षकांसाठी ती मनोरंजनाची पर्वणी असते. महासंगम सुरू असताना मालिकांमधील नायक-नायिका एकत्र येतात, खलनायक नायिका एकत्र दिसतात.

सध्या झी मराठी वाहिनीवरील दोन लोकप्रिय मालिकांचा महासंगम पाहायला मिळत आहे. ‘पारू’ व ‘सावळ्याची जणू सावली’ या दोन्ही मालिकांचे महासंगम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सारंगच्या कंपनीतील प्रोडक्टवर स्वरा इनामदार नावाच्या मुलीने टीका करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सारंगला संताप आला होता. त्यानंतर तो त्या मुलीला समजावण्यासाठी तिच्या घरी गेला होता. मात्र, जेव्हा तो तिच्या घरी गेला, तेव्हा त्या मुलीचा आधीच खून झाला होता. तिचे मृत शरीर कपाटात ठेवले होते. जेव्हा त्याने कपाट उघडले, तेव्हा तिचे मृत शरीर त्याच्या अंगावर पडते. तिचे रक्त सारंगच्या शर्टवर लागते. त्याचदरम्यान आदित्य तिथे फू़ड डिलिव्हरी करण्यासाठी गेला होता.

पोलिसांना जेव्हा त्या मुलीच्या मृत्यूबद्दल समजले तेव्हा त्यांनी आधी आदित्यला अटक केली होती. मात्र, कोणतेही ठोस पुरावे सापडले नसल्याने त्यांनी त्याला सोडले. मात्र, त्यानंतर पोलिसांनी सारंगला अटक केली. सारंगला अटक झाल्यानंतर सावलीसह तिलोत्तमा व इतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. सावली व तिलोत्तमा भावूक झालेल्या दिसल्या, तर शिवानीला सारंगची कंपनी तिला मिळवता येईल, अशी आशा वाटत आहे. तसेच परिस्थितीचा फायदा घेऊन सारंग व सावलीला वेगळे करण्याची तिची योजना आहे.

‘शिवा’ व ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकांत दिसलेले कलाकार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘पारू’ व ‘सावळ्याची जणू सावली’च्या महासंगमचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सारंगला कोर्टात हजर केले जाते. सारंगच्या विरुद्ध लढणारे वकील म्हणतात की सगळे पुरावे आपल्यासमोर आहेत. स्वरा इनामदार हिचा खून सारंग मेहेंदळे यांनीच केलेला आहे.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की शिवानी सावलीजवळ येते आणि तिला म्हणते की, जर मी ठरवलं तर सारंग जेलमधून सुटू शकतो. हे म्हणताना ती सावलीच्या मंगळसूत्राला हात लावते आणि म्हणते, “पण तो माझा झाला पाहिजे.” पारू शिवानीला म्हणते, “एक गोष्ट लक्षात ठेवायची, सावली व सारंग सर कधीच वेगळे होऊ शकत नाहीत.” तर सावलीच्या चेहऱ्यावर चिंता दिसते.

सारंगची केस लढण्यासाठी कोणताही वकील तयार होत नसल्याचे पाहायला मिळते. स्वरा इनामदारची केस लढणारे वकील असेही म्हणतात की, कोण अशा आरोप्याचं वकीलपत्र स्वीकारेल? तितक्यात एक आवाज येतो. एका वकील महिलेची एन्ट्री होते. ती म्हणते, मी कालिंदी धर्माधिकारी. सारंग मेहेंदळे यांचं वकीलपत्र मी घेतलेलं आहे.”

हा व्हिडीओ शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “कालिंदी धर्माधिकारी सारंगला खुनाच्या आरोपातून निर्दोष सोडवू शकतील का?”, अशी कॅप्शन दिली आहे.

स्वरा इनामदारची केस लढणारे वकील म्हणजे अभिनेते रमेश वाणी आहेत. त्यांनी ‘शिवा’ मालिकेत रामभाऊंची भूमिका साकारली होती, तर कालिंदी धर्माधिकारी या भूमिकेत अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतदेखील अभिनेत्रीने कालिंदी धर्माधिकारीने वकिलाची भूमिका साकारत सूर्या दादाला मदत केली होती. आता सारंगचीदेखील ती निर्दोष सुटका करू शकणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.