Savalyachi Janu Savali upcoming twist: ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येताना दिसतात. तिलोत्तमाचे निर्णय अनेकदा कुटुंबियांना चक्रावून सोडतात. तर काही ऐश्वर्या तिच्या कुटुंबाच्या विरोधात कारस्थान करताना दिसते. ताराला हाताशी घेऊन ती सावलीविरुद्ध अनेक योजना करते.

सावली व सारंग यांच्यात दुरावा यासाठी ती सतत प्रयत्न करते. जर सावलीचे घरातील महत्व वाढले, तर तुला घरात कोणीही किंमत देणार नाही, असे सतत ती ताराला सांगते. आता सावली व सारंगच्या आयुष्यात एका नवीन व्यक्तीची एन्ट्री झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच सारंग व सावलीच्या आयुष्यात शिवानीची एन्ट्री झाली आहे. शिवानीला सारंग आवडला असून तिला सावली व सारंग यांना वेगळे करायचे असल्याचे तिच्या कृतीतून पाहायला मिळत आहे. सावलीचे मानलेले वडील जगन्नाथने सावलीला तिच्या आयुष्यात येणाऱ्या या संकटाबाबत तिला इशारा दिला होता.

तसेच, घरी आलेल्या जोगतिनीनेदेखील स्वत:च्या संसारासाठी तिला दुर्गा होण्यास सांगितले होते. आता या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सावली घेणार मोठा निर्णय

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की शिवानी मनातल्या मनात म्हणते की सावलीला जर मी सारंगच्या जवळ जाण्याने असुरक्षित वाटत असेल, तर मी सारंगला माझ्या इतक्या जवळ आणेन की सावली ते बघून जळून खाक झाली पाहिजे. यादरम्यान ती मुद्दाम सारंगच्या उगाचच जाण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्याला स्पर्श करताना दिसते. ते सावली पाहते.

प्रोमोममध्ये पुढे पाहायला मिळते की सावली स्वत:शीच बोलत आहे. ती म्हणते, “शिवानी मॅडमनी पुन्हा असं काही करण्याचा प्रयत्न केला ना, तर मी गप्प बसणार नाही. मी त्यांना दाखवून देईन की तुमची बायको किती डेंजर आहे.” हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “शिवानीमुळे सावलीपासून दुरावणार का सारंग?”, अशी कॅप्शन दिली आहे.

दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार, शिवानीच्या कटाला सावली कशी सामोरी जाणार, सारंगला शिवानीच्या मनसुब्याविषयी समजणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.