Savlyachi Janu Savali and Paaru Upcoming Twist: झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ व ‘पारू’ या दोन्ही मालिका लोकप्रिय आहेत. या मालिकांतील सर्वच पात्रे त्यांच्या वेगळेपणामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. याआधी बऱ्याच वेळा सावळ्याची जणू सावली आणि पारू या दोन्ही मालिकांचा महासंगम पाहायला मिळाला आहे.
आता पुन्हा एकदा या दोन्ही लोकप्रिय मालिकांचा महासंगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर या महासंगमचा एक प्रोमो नुकताच शेअर केला आहे.
सावली व पारूच्या घरावर मोठं येणार संकट
या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, मेहेंदळेंच्या घरी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तिथे आदित्य आणि पारूदेखील येतात. त्यांना पाहून अहिल्यादेवीचा संताप होतो. ती तिलोत्तमाला म्हणते की, तू गेस्ट लिस्ट तपासली नव्हतीस का? इथे नको ती माणसं का आली आहेत? ते ऐकल्यानंतर पारूची मान खाली जाते.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सगळ्यांच्या मोबाईलवर एक व्हिडीओ येतो. त्या व्हिडीओमध्ये एक मुलगी दिसते. तिच्या चेहऱ्यावर जागोजागी काळे डाग दिसत आहेत. ती मुलगी म्हणते की, तुमच्या क्रीमरमुळे माझे काय झाले आहे, बघितलं ना? तो व्हिडीओ पाहून सारंग व तिलोत्तमाच्या चेहऱ्यावर रंग उडल्याचे दिसत आहे. सारंग पुढे कोणाला तरी फोनवर म्हणतो, “हे जर खोटं असेल, तर माझ्याइतकं वाईट कोणी नसेल”, हे अहिल्यादेवी ऐकते.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळत की, जगन्नाथ गाडी चालवत आहे. ते गाडीच्या प्रकाशात सारंगला बघतात आणि ब्रेक लावतात. सारंगच्या पांढऱ्या शर्टवर रक्त लागल्याचे दिसत आहे. सारंगला त्या अवस्थेत पाहून जगन्नाथला धक्का बसतो. पुढे असे दिसते की, कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलीस येतात. ते म्हणतात की, एक खून झाला आहे आणि त्याच्या तपासासाठी आम्ही इथे आलो आहोत. ते ऐकल्यानंतर सारंग घाबरल्यासारखा दिसत आहे. तिथेच उभ्या असलेल्या आदित्यच्या शर्टावर रक्त लागल्याचे दिसत आहे. पोलीस म्हणतात की, आदित्य किर्लोस्कर आमच्याकडे तुमच्याविरुद्ध ठोस पुरावे आहेत. पोलीस त्याच्या हातात बेड्या घालून त्याला घेऊन जातात.
आदित्य पोलिसांच्या गाडीत बसल्यानंतर पारू त्याच्याजवळ जाते. तेव्हा आदित्य तिला सांगतो की, हे ज्यानं केलं आहे, हे तो सांगत नाही, तोपर्यंत मी काहीच बोलू शकत नाही. त्यावेळी सारंगचा चेहरा दाखवला जातो. पोलिसांची गाडी निघून जाते. पारू व सावली शेवटी एकमेकींना धीर देताना दिसतात. हा प्रोमो शेअर करताना पारू आणि सावली दूर करू शकतील का कुटुंबावर आलेलं संकट? अशी कॅप्शन दिली आहे.
दरम्यान, आता मालिकेत पुढे काय घडणार, सारंग व आदित्य या संकटातून कसे बाहेर पडणार, हे कारस्थान कोणी केले आहे, पारू व सावली यातून कसा मार्ग काढणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या महासंगममध्ये नेमका काय ट्विस्ट येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.