Shivani Sonar talks about her spiritual side:अभिनेत्री शिवानी सोनार सध्या तारिणी या मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेत तिने तारिणी ही भूमिका साकारली आहे. एक धाडसी भूमिका तिने साकारली आहे.

तारिणी मालिकेत ती निडर आणि न्यायासाठी लढणाऱ्या अंडरकव्हर पोलिसाच्या भूमिकेत झळकत आहे. आता अभिनेत्री शिवानी सोनारने नुकताच मराठी सिरिअल ऑफिशिअलशी संवाद साधला. यावेळी तिने आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील एका खास अध्यात्मिक बाजूचा उल्लेख केला.

“माझ्या व्यावसायिक जीवनात मी…”

शिवानी म्हणाली, “चंद्रघंटा देवी ही माझ्या स्वभावाशी अतिशय जुळणारी आहे. तिचं एक रूप धाडसी, रक्षण करणारी असून दुसरं अत्यंत शांत आणि संयमी असं आहे. माझ्या व्यावसायिक जीवनात मी नेहमीच धाडसी आणि आक्रमक निर्णय घेत आली आहे.”

पुढे शिवानी म्हणाली, “नवनवीन भूमिका साकारताना धैर्य दाखवत आले आहे. पण जेव्हा गोष्ट माझ्या कुटुंबाची असते. तेव्हा मी खूप शांत आणि समजूतदार असते. पूर्वी मी थोडी चंचल होते, पण लग्नानंतर माझ्या आयुष्यात स्थैर्य आलं, दृष्टिकोन बदलला. कलाक्षेत्रात स्थैर्य नसतंच, इथे सतत बदल घडत असतात.”

“भूमिका, संधी, स्पर्धा या सगळ्याच्या मध्यवर्ती राहून मी माझ्या आतल्या शिवानीला शांततेने आणि श्रद्धेने खंबीर केलं आहे. ‘तारिणी’ या भूमिकेमुळे मला माझ्यातली ही दोन रूपं दाखवण्याची संधी मिळाली आहे. ती बाहेरच्या जगात निडर आणि धाडसी आहेत. पण आपल्या माणसांत असताना समजूतदार आणि शांतताप्रिय आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात झालेले बदलच या पात्राला अधिक प्रभावी बनवतात,” असं शिवानीने स्पष्ट केलं.

दरम्यान, तारिणी मालिकेतील शिवानीच्या भूमिकेचे कौतुक होताना दिसत आहे. तारिणी एक पोलीस आहे, हे कोणालाच माहित नाही. कारण, ती अंडरकव्हर पोलीस आहे. घरी तिच्यावर अनेकदा अन्याय केला जातो. मात्र, घरात शांतता राहावी, यासाठी ती समजूतदारपणा दाखवते.

मालिकेत वेगवेगळ्या केस आल्यानंतर तारिणी व तिची टीम ज्या पद्धतीने त्यावर काम करते, त्याचे कौतुक होते. विशेष म्हणजे, अडचणीत असलेल्यांना कळत नाही की त्यांची मदत कोणी केली आहे. इतक्या गुप्त पद्धतीने तिची टीम काम करते. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार याबद्दल कायमच उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते.