Zee Marathi Tarini Serial Producers : ‘झी मराठी’वर लवकरच एक नवीन मालिका सुरू होणार आहे. या सिरियलचं नाव आहे ‘तारिणी’. तारिणी बेलसरे ही मुंबईत राहणारी असते. तारिणीची आई पोलीस खात्यात हेड कॉन्स्टेबल होती. अत्यंत प्रामाणिक…पण तिच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले असतात. तारिणीच्या आईने याच भीतीपोटी आत्महत्या केली असं चित्र सर्वांसमोर उभं केलेलं असतं.
तारिणीच्या वडिलांनी तेव्हा मुलीच्या भविष्याचा विचार करत दुसरं लग्न केलं. तारिणीची सावत्र आई घरात येताक्षणी त्या हेड कॉन्स्टेबलचा उल्लेखही घरात करायचा नाही असं सगळ्यांना सांगितलंय. पण, आपली आई चुकीच कधीच वागू शकत नाही हा विश्वास तारिणीला आहे, म्हणून आपल्या आईच सत्य आणि खऱ्या गुन्हेगाराला तिला जगापुढे आणायचं आहे. याचसाठी तारिणी पोलिसात भरती झाली, तिच्यासह केदार नावाचा एक मुलगा असतो. जो तिला कायम साथ देणार आहे. जशी तारिणी तिच्या आईच्या गुन्हेगाराचा शोध घेतेय अगदी त्याचप्रमाणे केदार त्याच्या वडिलांचा शोध घेत आहे. दोघे एकमेकांना आधार आहेत.
मालिकेची निर्माती आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री
केदारच्या मनात तारिणी विषयी प्रेमाची भावना आहे पण, तो तिला आजवर सांगू शकला नाही. या मालिकेचं कथा व पटकथा लेखन प्रल्हाद कुडतरकर यांनी केलं आहे. तर, पूर्णानंद वांढेकर मालिकेचे संवाद लेखक आहेत. या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत भीमराव मोरे. तर मालिकेचे निर्माते आहेत एरिकॉन टेलिफिल्म्सचे शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई. विविध मराठी मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत व तिचे पती या मालिकेचे निर्माते आहे.
शर्मिष्ठा राऊत ‘तारिणी’ या तिच्या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करत लिहिते, “झी मराठी वाहिनीवरील आमचं तिसरं पुष्प…नवीन मालिका आणि एक नवीन सुरुवात…घेऊय येत आहोत तारिणी.” यापूर्वी शर्मिष्ठाने ‘नवरी मिळे हिटलरला’ आणि ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकांच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
दरम्यान, शिवानी सोनार, अभिज्ञा भावे आणि अभिनेता स्वराज नागरगोजे यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘तारिणी’ मालिका ११ ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे.