Zee Marathi Tarini Serial : ‘तारिणी’ मालिकेत नुकताच एक महत्त्वाचा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाला. दयानंद खांडेकर यांना केदार हाच त्यांचा खरा मुलगा असल्याचं सत्य समजलं आहे. त्यामुळे आता मालिका कोणतं वळण येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यादरम्यान, तारिणी आता युवराजचं खरं रूप सर्वांसमोर उघड करण्यासाठी खांडेकरांच्या घरात प्रवेश करणार आहे.

निशीसमोर काहीही करून युवराजचं खरं रूप उघड करायचं हे एकमेव उद्दिष्ट सध्या तारिणीसमोर आहे. यामुळे तारिणी आता काही दिवस खांडेकरांच्या घरी राहायला येणार आहे. त्याचवेळी युवराजवर एका ड्रग्ज डीलमधील नुकसान भरपाईची रक्कम न भरल्याचा आरोप आहे. या रहस्यामागे नक्की कोण आहे, हे शोधण्याचा निर्धार तारिणी करते.

दुसरीकडे, निशीची खांडेकरांच्या घरात जेवण बनवायला येत नसल्याने कोंडी होणार आहे. या सगळ्यात तारिणी निशीच्या मदतीला धावून येणार आहे. पण, कौशिकीच्या मनात संशयाचं बीज पेरलं जातं. पद्मिनी, चेतना आणि ईशा सतत निशीसमोर अडथळे आणतात, पण तारिणी आपल्या हुशारीने ते दूर करते. इराबरोबर झालेल्या तिच्या मैत्रीने कौशिकीला आनंद होतो, पण शेखरप्रती तारिणीची नम्र वागणूक पाहून ती पुन्हा नाराज होते.

यादरम्यान केदार सुद्धा तारिणीला मिस करत असतो. तर, दयानंदला तारिणी आणि केदारची वाढती जवळीक दिसते. तो त्यांच्या नात्याला बळ देण्यासाठी तारिणीकडून केदारच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला घरी बोलवण्यासाठी कारण शोधतो.

तारिणी आणि युवराज यांच्यातील वाद आता अधिक रंगणार आहे. युवराज तिची खिल्ली उडवतो, पण तारिणी ठामपणे सांगते की ती त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर आणणारच आहे. निशीला मात्र त्यांच्या नात्याबद्दल गैरसमज होतो आणि युवराज या गैरसमजाला खतपाणी घालतो. तारिणी युवराजच्या खोलीत शोध घेण्यासाठी जाते आणि तिथे तिची भेट गुलाबशी होते. पण जेव्हा सगळे खोलीत जातात, तेव्हा तिथे कुणीच नसतं. त्यामुळे तारिणीच्या मनात शंका निर्माण झालीये…”तो माणूस नक्की कोण होता आणि अचानक कुठे गेला?” तारिणी कसं सोडवेल हे कोडं. हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

दरम्यान, ‘तारिणी’ मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता झी मराठीवर पाहायला मिळेल.