Tula Shikvin Changalach Dhada : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यामुळे या मालिकेच्या चाहत्यांमध्ये सध्या नाराजीचं वातावरण आहे. अशातच याच वाहिनीवरची आणखी एक मालिका लवकरच ऑफ एअर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेली दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने शिवानी रांगोळे आणि हृषिकेश शेलार ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळाली. या मालिकेत शिवानी-हृषिकेशने अक्षरा-अधिपती या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय लोकप्रिय अभिनेत्री कविता मेढेकर या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच हटके भूमिकेत प्रेक्षकांना दिसल्या. त्यांनी या मालिकेत अक्षराच्या सासूबाई खलनायिका भुवनेश्वरीची भूमिका साकारली आहे.

दमदार स्टारकास्ट, हटके कथानक यामुळे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. ही मालिका १३ मार्च २०२३ रोजी प्रसारित करण्यात आली. यानंतर तब्बल तीन वेळा या मालिकेची वेळ देखील बदलण्यात आली. सध्या ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर सायंकाळी सहा वाजता प्रसारित केली जाते. आता लवकरच ही मालिका सर्वांचा निरोप घेईल. याबाबत भुवनेश्वरीची भूमिका साकारणाऱ्या कविता मेढेकरांनी स्वत: माहिती दिली आहे.

कविता मेढेकर यांना महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, “मालिका आता निरोप घेतेय, आता नाटकाच्या जोडीने आणखी कोणत्या माध्यमात झळकणार” असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अभिनेत्री म्हणाल्या, “मालिका संपल्यावर २ ते सव्वा दोन वर्षांनी मिळणाऱ्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी मी काही योजना करेन. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे ७५० हून अधिक प्रयोग झाले आहेत आणि ते असेच सुरू राहतील. मला आणखी एखाद्या नाटकात काम करायला नक्की आवडेल. पण, मला वाटतं कोणत्याही माध्यमापेक्षा अलीकडच्या काळात कंन्टेंट महत्त्वाचा आहे. त्यामुळे भूमिका आव्हानात्मक असेल तर कोणत्याही माध्यमात काम करेन.” यावरून मालिका लवकरच ऑफ एअर होतेय हे स्पष्ट झालेलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता ही मालिका नेमकी कधी संपणार, याची निश्चित तारीख अद्याप समोर आलेली नाही. याशिवाय ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेऐवजी सायंकाळी सहा वाजता कोणती मालिका प्रसारित होणार या गोष्टींचा उलगडा लवकरच होईल.