Zee Marathi : सध्या छोट्या पडद्यावरील वाहिन्यांवर टीआरपीच्या दृष्टीकोनातून अनेक बदल केले जात आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवरील दोन लोकप्रिय मालिकांनी नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. विशेष म्हणजे या दोन्ही मालिकांचा एकाच दिवशी शेवट करण्यात आला. आता जुन्या २ मालिका संपल्यावर कोणत्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार, वाहिनीवर कोणकोणते बदल होणार याबद्दल जाणून घेऊयात…
‘झी मराठी’वरील तब्बल २ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यासह एजे-लीलाची हटके लव्हस्टोरी असलेली ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका सुद्धा ऑफ एअर झाली आहे. या दोन्ही मालिकांचे विशेष भाग २५ मे रोजी प्रसारित करण्यात आले.
अक्षराच्या मालिकेत भुवनेश्वरी व चारुहासचा लग्नसोहळा पार पडून शेवट गोड झाला. तसेच अधिपती व चारुहास या बाप-लेकामधला दुरावा सुद्धा मिटला. तर, ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये किशोरचं खरं रुप सर्वांसमोर उघड होऊन लीलाचा डोहाळेजेवण कार्यक्रम पार पडल्याचं पाहायला मिळाला.

‘नवरी मिळे हिटलरला’ आणि ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या दोन मालिका ऑफ एअर झाल्या असल्या तरीही वाहिनीने प्रेक्षकांसाठी दोन नव्या मालिकांची घोषणा केलेली आहे. यापैकी ‘देवमाणूस-मधला अध्याय’ ही किरण गायकवाडची बहुचर्चित मालिका २ जूनपासून सुरू होणार आहे. ही मालिका रोज रात्री १० वाजता प्रसारित केली जाईल.
याशिवाय ‘झी मराठी’वर येत्या काही दिवसात ‘कमळी’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. यामध्ये अभिनेत्री विजया बाबर प्रमुख भूमिका साकारणार आहे. वाहिनीने अद्याप या मालिकेच्या प्रसारणाची तारीख जाहीर केलेली नाही. कमळीमध्ये विजयाबरोबर लोकप्रिय अभिनेत्री योगिनी चौक देखील झळकणार आहे.
दरम्यान, ‘देवमाणूस- मधला अध्याय’ आणि ‘कमळी’ या दोन मालिकांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार याचा उलगडा येत्या काही दिवसांतच होणार आहे. तसेच २ जूनपासून ‘देवमाणूस’ मालिका सुरू होणार असल्याने ‘चल भावा सिटीत’ हा शो देखील सर्वांचा निरोप घेण्याची दाट शक्यता आहे.