Telugu actress Dimple Hayathi and Husband Booked for Abusing Domestic Help : तेलुगू अभिनेत्री डिंपल हयाती कायदेशीर अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. अभिनेत्री आणि तिचा पती व्हिक्टर डेव्हिड यांच्याविरुद्ध त्यांच्या मदतनीसने गंभीर आरोप केले असून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. डिंपलने मारहाण करून विवस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप मदतनीसने केला आहे.
‘सियासत डॉट कॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार, २२ वर्षीय प्रियंका बीबर हिने डिंपलच्या विरोधात हैदराबादमधील फिल्मनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रियंका मूळची ओडिसाची आहे, ती कामाच्या शोधात हैदराबादमध्ये आली होती. तिला डिंपल हयातीच्या घरी काम मिळालं. पण, काम करण्यासाठी डिंपलच्या घरी गेल्यानंतर तिचा वारंवार अपमान केला गेला, शिवीगाळ केली जायची आणि व्यवस्थित जेवणही दिलं जायचं नाही, असा आरोप प्रियंकाने केला आहे.
२९ सप्टेंबर रोजी या जोडप्यामध्ये आणि प्रियंकामध्ये वाद झाला, त्यादरम्यान प्रियंकाने आरोप केला की तिच्यावर अत्याचार करण्यात आला. डिंपल आणि तिच्या नवऱ्याने प्रियंकाला तिच्या आई-वडिलांना मारण्याची धमकी दिली. जेव्हा तिने हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा डिंपलच्या नवऱ्याने तिचा फोन हिसकावून घेतला आणि फोडून टाकल्याचं मदतनीसने म्हटलं आहे. त्यांच्यात झालेल्या वादात प्रियंकाचे कपडे फाटले गेले.
प्रियंकाने असा दावा केला आहे की, भांडणात कपडे फाटले गेल्यानंतर तिचा विवस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न अभिनेत्रीने केला. तुझं आयुष्य आमच्या पायातल्या चपलांच्याबरोबरही नाही, असं म्हणत डिंपलने हिणवल्याचं प्रियंकाने सांगितलं आहे. एजेंटच्या मदतीने प्रियंका पोलिसांपर्यंत पोहोचली. या प्रकरणी अद्याप डिंपल किंवा तिच्या पतीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
डिंपल हयाती कोण आहे?
डिंपल हयातीबद्दल बोलायचे झाले, तर तिने २०१७ च्या तेलुगू चित्रपट ‘गल्फ’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. डिंपल हयातीने ‘अतरंगी रे’, ‘देवी २’, ‘खिलाडी’,’युरेका’, ‘रामबनम’ आणि ‘वीरमाए वागाई सूदूम’ सारख्या चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे.