Thalapathy Vijay Stampede Rishabh Shetty Reaction : २७ सप्टेंबर रोजी अभिनेता थलपती विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली होती. त्यामध्ये १० मुलांसह ४१ जणांचा मृत्यू झाला होता. तसंच अनेक जण जखमीसुद्धा झाले होते. तमिळनाडूतील करूर येथे ही घटना घडली. त्या घटनेनंतर अनेकांनी विजयवर टीकात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.

अशातच आता विजयच्या रॅलीतील चेंगराचेंगरीबद्दल ‘कांतारा’चा दिग्दर्शक ऋषभ शेट्टीनं त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या घटनेबद्दल त्यानं ‘इतक्या लोकांचा मृत्यू होणं ही अत्यंत वाईट घटना असून, हे काही जाणीवपूर्वक घडलं नसल्याचं म्हटलं.

एनडीटीव्हीशी बोलताना या चेंगराचेंगरीबद्दल ऋषभ शेट्टी म्हणाला, “आपल्याला एखादा हीरो किंवा त्याची भूमिका आवडली, की आपण त्याची पूजा करतो; पण ही चेंगराचेंगरीसारखी घटना अत्यंत दुर्दैवी होती. इतक्या लोकांचा मृत्यू होणं फारच वाईट आहे. मला वाटत नाही की, त्यासाठी एका व्यक्तीला दोषी ठरवता येईल. ही एकत्रितपणे झालेली चूक असू शकते. म्हणूनच अशा गोष्टींना आपण ‘अपघात’ म्हणतो.”

पुढे तो म्हणाला, “अशा घटना घडू नयेत यासाठी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. पण एकदा का जमाव हाताबाहेर गेला, तर त्याला नियंत्रणात आणणं खूप कठीण होतं. मी त्यावर काय बोलणार? आपण सहजपणे पोलिसांना किंवा सरकारला दोष देतो. त्यांचीही जबाबदारी आहे, हेही खरं आहे; पण काही वेळा त्यांनाही अशा गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येतात.”

या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर ७ ऑक्टोबर रोजी विजयनं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यावेळी विजय यांनी आपल्या तमिळगा वेत्त्री कळगम (TVK) पक्षाच्या वतीनं त्यानं सांत्वन केलं होतं.

दरम्यान, चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी FIR दाखल केला असून, त्यात TVK प्रमुख विजयला या घटनेस जबाबदार धरलं आहे. FIR नुसार, विजय सभास्थळी त्याच्या प्रचार वाहनात बराच वेळ थांबला. त्यामुळे गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरीसारखी दुर्दैवी घटना घडली, असं म्हटलं गेलं आहे.