आज ‘साहो’, ‘राधे-श्याम’, ‘आदिपुरुष’सारखे सलग सुपरफ्लॉप चित्रपट देणाऱ्या प्रभासने ‘बाहुबली’च्या माध्यमातून पॅन इंडिया स्टार हे बिरुद आधीच मिळवलं होतं. ‘बाहुबली’च्या दोन्ही भागांना मिळालेलं अभूतपूर्व असं यश अद्याप आणखी कोणत्याही भारतीय चित्रपटाला मिळालेलं नाही. यामध्ये सगळ्यांच्याच कामाची प्रशंसा झाली पण खासकरून प्रभासने मात्र प्रेक्षकांच्या मनात घर केलं अन् याबरोबरच आणखी एक पात्र लोकांच्या डोक्यात फिट्ट बसलं ते म्हणजे कटप्पा. चित्रपटाचा दुसऱ्या भागाची जेव्हा घोषणा झाली तोपर्यंत कटप्पा हे नाव प्रत्येकाच्या ओठांवर होतं.

याबरोबरच “कटप्पाने बाहुबली को क्यो मारा?” हा प्रश्नही तेव्हा प्रत्येक प्रेक्षक विचारत होता. एकूणच बाहुबलीप्रमाणेच कटप्पा हे पात्रही तितकंच लोकप्रिय झालं. ही भूमिका साकारली प्रसिद्ध अभिनेते सत्यराज यांनी, याआधी ते हिंदीत ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटातही झळकले होते, पण ‘बाहुबली’मुळे त्यांना खरी ओळख मिळाली. पण तुम्हाला माहितीये का की या भूमिकेसाठी सत्यराज ही निर्माते व दिग्दर्शकांची पहिली पसंती नव्हते. एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सर्वप्रथम ही भूमिका साकारणार होता.

आणखी वाचा : अभिनयात उत्तम कोण अभिषेक की ऐश्वर्या? जेव्हा श्वेता बच्चनने दिलेलं ‘हे’ उत्तर

‘रेडीफ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे वडील विजेंद्र प्रसाद यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता. ते म्हणाले, “या भूमिकेसाठी आमच्या समोर पहिले नाव आलं ते म्हणजे संजय दत्तचं, पण त्यावेळी तो तुरुंगात होता अन् म्हणूनच ही भूमिका संजय दत्तच्या हातून निसटली अन् त्यानंतर आम्ही सत्यराज यांच्याकडे ही भूमिका घेऊन गेलो व त्यांनी ती अगदी लीलया पेलली.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय दत्तची ‘बाहुबली’दरम्यान संधी हुकली असली तरी तुरुंगातून बाहेर येताच आणखी एक मोठी संधी त्याच्याकडे चालत आली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण करण्यासाठी संजय दत्त सज्जच होते अन् सुपरस्टार यशच्या ‘केजीएफ चॅप्टर २’मधील मुख्य खलनायकाच्या भूमिकेसाठी संजय दत्तला घेण्यात आलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तर वेगळाच इतिहास रचला परंतु संजय दत्तचंही प्रचंड कौतुक झालं.