मुलांच्या अंगी आपलेच गुण असावेत असं सर्वच पालकांना वाटतं. कलाविश्वात आजवर बऱ्याच अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मुलांनी आईवडिलांचा कित्ता गिरवला. पण, अभिनेता संजय दत्तला तसं वाटत नाहीये. अर्थात त्यामागची कारणंही तशीच आहेत. ‘इंडिया टुडे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मुलांनी आपले गुण घेऊ नयेत असंच संजूबाबाला वाटतंय.

संजय दत्त दिवंगत अभिनेता सुनील दत्त आणि नर्गिस यांचा मुलगा आहे. आई- वडिलांचा कलेचा वारसा त्याने पुढे चालवला. संजय दत्तच्या आजवरच्या प्रवासात बरेच चढ- उतार आले. अमली पदार्थाचे व्यसन आणि गुन्हेगारी क्षेत्रातील मंडळींशी संबंधांमुळे तो अडचणीत आला.

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात अवैधरित्या शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी त्याला तुरुंगवास भोगावा लागला. ही शिक्षा भोगून आल्यानंतर आता संजूबाबा सर्वसामान्य आयुष्य जगत आहे. आगामी चित्रपटासाठी समर्पकपणे काम करत आहे. पण, असं असतानाही त्याच्या मनात एका गोष्टीची सल मात्र कायम आहे. तीन मुलांच्या वडिलांच्या भूमिकेत असलेला हा अभिनेता त्याच्या मुलांसाठी काही वेगळीच स्वप्न पाहतोय.

संजय दत्त म्हणतो, ‘मी त्यांच्या आयुष्यात महत्त्वाच्या असणाऱ्या बऱ्याच गोष्टी शिकवतोय. मोठ्यांचा, आपल्याला मदत करणाऱ्यांचा आदर करणं, आपले संस्कार काय आहेत हे समजून घेणं या सर्व गोष्टींची मी त्यांना शिकवण देतोय. मी फक्त एवढीच प्रार्थना करु इच्छितो की, मुलाने माझ्याप्रमाणे होऊ नये. कारण, माझ्यामुळे माझ्या वडिलांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या आहेत, त्याच यातना सोसण्याची माझी इच्छा नाहीये.’

वाचा : रेखा आजही अमिताभ यांच्या ‘या’ दोन गुणांच्या प्रेमात

‘इंडिया टुडे माइंड रॉक्स युथ समिट’मध्ये संजय दत्तने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. यावेळी आपल्या पालकत्त्वाविषयी सांगताना तो म्हणला, ‘आमच्या वडिलांनी आम्हाला सर्वसामान्य मुलांप्रमाणेच मोठं केलं. किंबहुना मला बोर्डिंग स्कूलमध्येही पाठवलं होतं. अगदी त्याचप्रमाणे मी माझ्या मुलांनाही मोठं करतोय.’ सध्या संजूबाबा त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी विविध कार्यक्रमांना हजेरी लावतोय. त्याच्या आगामी ‘भूमी’ या चित्रपटात वडील- मुलीच्या अव्यक्त नात्याचं चित्रण करण्यात आलं आहे.