‘लोगन’, ‘गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी’, ‘स्पायडरमॅन होमकमिंग’ आणि आता ‘थॉर राग्नारोक’ हा सुपरहिरोपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. गेल्या दोन वर्षांत ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ने एकाहून एक सरस अशा सुपरहिरोपटांची निर्मिती केली आहे. या पाश्र्वभूमीवर चाहते ‘थॉर’ या सुपरहीरोची आतुरतेने वाट पाहात आहेत. हातात हातोडा नसलेल्या ‘थॉर’चं एक पोस्टर निर्मात्यांद्वारे इंटरनेटवर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कॉमिक्स, कार्टून आणि आता सिनेमा असा लांबलचक प्रवास करून आलेल्या जवळ जवळ प्रत्येक सुपरहिरो व्यक्तिरेखेला प्रेक्षक गेल्या अनेक वर्षांपासून ओळखत आहेत. त्यामुळे त्यांच्या कथा पुढे नेत असताना त्यात तोचतोचपणा येऊ नये यासाठी दिग्दर्शक प्रयत्नशील असतात. यासाठी मग चित्रपटातील पात्रांची जीवनशैली, त्यांचा पेहराव, त्यांची शस्त्रास्त्रे यांत काही बदल केले जातात. अशाच प्रकारचा काहीसा बदल ‘थॉर’च्या व्यक्तिरेखेतही केला असण्याची शक्यता आहे. परंतु पोस्टरमध्ये थॉरच्या हातात हातोडय़ाच्या जागी तलवार पाहून चाहते गोंधळात पडले आहेत. थॉरचा हातोडा हे त्याचे मुख्य शस्त्र आहे. त्याव्यतिरिक्त इतर दुसऱ्या कोणत्याही सुपहिरोला उचलताना न येणारे हे शस्त्रच त्याला सुपरहिरो बनवते. त्यामुळे हातोडय़ाशिवाय थॉरचा विचारच करता येत नाही. परंतु दिग्दर्शकांनी व्यक्तिरेखेत काही बदल केले गेल्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या मते आजवर पाहिलेल्या आणि या चित्रपटानंतर चाहत्यांना ज्ञात होणाऱ्या थॉरमध्ये प्रचंड फरक असणार आहे. म्हणजेच आगामी चित्रपटात ‘थॉर’चा नवीनच अवतार पाहायला मिळणार यात शंका नाही.