बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या कंगना अनेक चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘थलायवी’ या चित्रपटाच्या यशानंतर आता कंगना निर्मिती क्षेत्रात तिचे नशीब आजमावताना पाहायला मिळणार आहे. कंगना गेल्या काही दिवसांपासून ‘टिकू वेड्स शेरु’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात व्यस्त आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कंगना ही निर्माती म्हणून सिनेक्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.

कंगना निर्मिती करत असलेल्या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर हे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. नुकतंच कंगनाने या चित्रपटाचे तीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील पहिल्या पोस्टरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी हा दिसत आहे. त्याच्या पोस्टरवर ‘मिट शेरु’ असे लिहिण्यात आले आहे. ‘हम जब मिलते हैं, तो दिल से मिलते हैं, वरना ख़्वाबों में भी मुश्किल से मिलते हैं,’ असे कॅप्शन या पोस्टरला देण्यात आले आहे.

तर दुसऱ्या पोस्टरवर ‘इंट्रोड्युसिंग टिकू’ असे लिहिण्यात आले आहे. ‘चलो तो चाँद तक , नहीं तो शाम तक,’ असे कॅप्शन हे पोस्टर शेअर करतेवेळी कंगनाने दिले आहे. त्यानंतर अवघ्या दोन तासांपूर्वी कंगनाने या चित्रपटासंदर्भातील आणखी एक पोस्टर शेअर केले आहे. त्यावर ‘टिकू वेड्स शेरु’ असे चित्रपटाचे नाव लिहिले आहे. यावर चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असेही लिहिण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘मणिकर्णिका फिल्म्स’द्वारे केली जात आहे.

“ज्या दिवशी पद्मश्री पुरस्काराने सन्मान मिळाला, त्याच दिवशी निर्माता म्हणून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. मणिकर्णिका फिल्म्स प्रा.लि. अंतर्गत मी माझ्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीचा फर्स्ट लूक तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे. टिकू वेड्स शेरु….आशा आहे की तुम्हाला हा चित्रपट आवडेल. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. लवकरच चित्रपटगृहांमध्ये भेटू,” असे कॅप्शन कंगनाने दिले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन साई कबीर यांनी केले आहे. तर कंगनाच्या प्रॉडक्शन हाऊस ‘मणिकर्णिका फिल्म्स’ अंतर्गत याची निर्मिती केली जात आहे. हा तिचा पहिला डिजीटल चित्रपट असणार आहे. कंगना आणि सई यांनी यापूर्वीही एकत्र काम केले आहे. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रिव्हॉल्व्हर राणी’ या चित्रपटात त्या दोघांही एकत्र काम केले होते.

कंगनाचा बहुप्रतिक्षित ‘थलायवी’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. फक्त भारतात नव्हे तर जगभरात या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. तर कंगनाच्या ‘तेजस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला डिसेंबर महिन्यापासून सुरूवात केली होती. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’नंतर सर्वेश मेवारा यांनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट असणार आहे.