बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा ‘तान्हाजीः द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट शुक्रवारी म्हणजेच १० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसत आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात सैफसोबतच अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
‘तान्हाजीः द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातील उदयभान राठोड यांच्या भूमिकेसाठी सैफला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. त्याने त्याचे केस आणि दाढी देखील वाढवली होती. त्याचा हा लूक नेहमीपेक्षा थोडा वेगळा आहे. त्यामुळे त्याला या लूकमध्ये पाहिल्यावर तैमूरची प्रतिक्रिया कशी असेल असा प्रश्न अनेकांना पडला होता. नुकताच सैफने एका मुलाखतीमध्ये त्याला पाहून तैमूरची प्रतिक्रिया कशी होती याचा खुलासा केला.
‘तैमूरने माझा लूक पाहिला. त्यानंतर तो मला सरदारजी सरदारजी असा आवाज देऊन बोलवू लागला’ असा खुलासा सैफने केला.
‘तान्हाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि अजय ही जोडी तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायला मिळाली. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण तान्हाजींची भूमिका साकारली आहे तर तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका काजोल साकारताना दिसत आहे. त्याचबरोबर मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे तर राजमाता जिजाऊंची भूमिका पद्मावती राव करत आहेत.