दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन लग्न करणार, अशा चर्चा रंगल्या आहेत. ४२ वर्षांची त्रिशा चंदीगडमधील एका उद्योजकाशी लग्न करत असल्याचं म्हटलं जात होतं. आता स्वतः त्रिशानेच पोस्ट करून यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्रिशाने लग्नाच्या अफवांवर नाराजी व्यक्त केली आहे.
त्रिशा कृष्णन चंदीगडमधील एका उद्योजकाशी लग्न करणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात होता. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्रिशा म्हणाली, “मला फार आवडतं, जेव्हा लोक माझ्यासाठी माझं आयुष्य प्लॅन करतात. आता ते माझं हनिमून शेड्यूल करतील याची मी वाट पाहत आहे.”

‘लिओ’ आणि ‘पोनियिन सेल्वन’ फेम त्रिशा अभिनेत्री अलिकडे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ट्रेंडिंग आहे. त्रिशाच्या लग्नाबद्दल काही काळाने सतत चर्चा होत असते. वृत्तानुसार त्रिशाने तिच्या आई-वडिलांनी निवडलेल्या चंदीगडमधील एका उद्योजकाशी लग्न करण्यास सहमती दर्शवली होती. मुलाच्या कुटुंबाला त्रिशाचे कुटुंबीय अनेक वर्षांपासून ओळखतात, असंही म्हटलं जात होतं. पण त्रिशा किंवा तिच्या कुटुंबाने कोणतीही अधिकृत पुष्टी केली नव्हती. आता त्रिशाने या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे.
त्रिशा इंडस्ट्रीत बऱ्याच वर्षांपासून सक्रिय आहे. पण ती तिचे वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवते. ती वैयक्तिक आयुष्याबद्दल जाहिरपणे बोलत नाही. पण एकदा तिने लग्नाबद्दल तिचं मत व्यक्त केलं होतं. “जर लग्नासाठी योग्य व्यक्ती भेटली तरच लग्नाचा विचार करेन, परंतु अजून योग्य वेळ आलेली नाही” असं ती म्हणाली होती.
१० वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ मध्ये त्रिशाने एकदा उद्योजक वरुण मनियनशी साखरपुडा झाला होता. पण लग्नापूर्वीच त्यांचा साखरपुडा मोडला. त्या वेळी आलेल्या वृत्तांनुसार त्रिशाला लग्नानंतरही अभिनय सुरू ठेवायचा होता, पण वरुणच्या घरचे लोक यासाठी तयार नव्हते, यावरून मतभेद झाले आणि साखरपुडा मोडला.
त्रिशाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची कमल हासनबरोबर ‘ठग लाईफ’ मध्ये दिसली होती. ती दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत व आघाडीची अभिनेत्री आहे.