अभिनेत्री त्रिशा कृष्णन ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमधून दिग्गज अभिनेत्यांसह काम केलं आहे. केवळ दाक्षिणात्यच नव्हे तर बॉलीवूडमध्ये काम करत तिने हिंदी प्रेक्षकांचीही मनं जिकंली आहे. अशातच आला लसवकरच ती एका नवीन भूमिकेतून झळकणार आहे. त्रिशा कृष्णनचा ‘ठग लाइफ’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘ठग लाइफ’मध्ये त्रिशा कृष्णन महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. महत्तवाचं म्हणजे याध्ये तिने अभिनेते कमल हासन यांच्याबरोबर काम केलं आहे. त्रिशानं यापूर्वीसुद्धा कमल हासन यांच्यासह बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘लिओ,’ ‘मनमदन अंबु,’ ‘थुंगा वनाम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये कमल हासन व त्रिशा कृष्णन यांनी काम केलं आहे. अशातच आता हे दोघे लवकरच नवीन चित्रपटातून झळकणार आहेत. परंतु, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्रिशा व कमल हासन यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल बोललं जात आहे. त्यावर अभिनेत्रीनं नुकतीच तिची प्रतिक्रिया दिली आहे.
‘ठग लाइफ’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्यामध्ये अॅक्शन, ड्रामा, रोमान्स या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. ट्रेलरमध्ये कमल हासन व त्रिशा कृष्णन यांचे रोमँटिक सीनही आहेत. ट्रेलरमधील त्रिशा व कमल हासन यांच्यातील रोमँटिक सीन पाहून सध्या प्रेक्षकांमध्ये यांबाबत चर्चा सुरू आहे. कमल हासन व त्रिशा यांच्यामध्ये ३० वर्षांचं वयाचं अंतर असल्यानं ही चर्चा सुरू असल्याचं दिसतं. अशातच आता त्रिशानं यावर प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट येत्या ५ जूनला प्रदर्शित होणार असल्यानं सध्या चित्रपटातील कलाकार प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. त्यानिमित्त मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्रिशा उपस्थित होती. यावेळी तिनं कमल हासन व तिच्या ऑनस्क्रीन केमिस्टीबद्दलच्या चर्चांवर वक्तव्य केलं.
पत्रकार परिषदेत चित्रपटाबद्दल बोलताना त्रिशा म्हणाली, “जेव्हा या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा मी त्याचा भागही नव्हते; पण तरीसुद्धा मला याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. मी म्हटलं ही केवळ जादू आहे.” पुढे कमल हासन व मणिरत्नम यांच्यातील काम करण्याच्या पद्धतीबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “या दोघांना एकत्र काम करताना बघणं माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. काम करताना ते दोघे एकमेकांशी डोळ्यांनी संवाद साधत असत इतकी त्यांच्यात छान केमिस्ट्री आहे.”
दरम्यान, त्रिशा नुकतीच ‘विदामुयार्ची,’ ‘गुड बॅड अगली’ या चित्रपटांमध्ये झळकली. त्यामध्ये तिच्यासह अभिनेते अजिथ कुमार दानेही चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकांत होते. आता ती कमल हासन यांच्यासह ‘ठग लाइफ’मध्ये झळकणार असून, त्यानंतर ती ‘विश्वंभरा’ या तेलुगू चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेता चिरंजीवी मुख्य भूमिकेत असणार आहे.