Hardeek Joshi Shares Accident Story : ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी. ‘तुझ्यात जीव रंगला’मधील त्याची राणा दा ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. अजूनही अनेक चाहते मालिकेची आठवण व्यक्त करताना दिसतात.
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेनंतर हार्दिक काही इतर मालिका, सिनेमे आणि रिअॅलिटी शोच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तसंच त्याने स्वत:चा नवा व्यवसायदेखील सुरू केला आहे. आपल्या अभिनयानं चर्चेत राहणारा हार्दिक सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो-व्हिडिओ शेअर करीत असतो.
२००५ मध्ये हार्दिकचा एक मोठा अपघात झाला होता, ज्यात त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली होती. याबद्दल त्यानं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे. हार्दिकच्या पायावरून चक्क बस गेल्याचा प्रसंग त्याने शेअर केला आहे. या अपघाताबद्दल हार्दिक असं म्हणाला, “मी बाइकवरून कॉलेजला जात असताना रस्त्यात पडलो. पडल्यानंतर मी बाइक सोडून दिली. तेवढ्यात मागून बस येत होती. ती बस बघून मी मागे बाईकला धरून मागे गेलो. तर त्या बसचं चाक माझ्या पायवरून गेलं.”
यानंतर हार्दिकनं सांगितलं, “त्यानंतर मी पुढे जाऊन फुटपाथवर बसलो. तेव्हा पहिलं तर हाडाला मार लागला होता. मोठ्या चाकांत काही छोटे दगड अडकलेले असतात, त्यापैकी एकही दगड त्या हाडाला लागला असता तर ते हाड राहिलंच नसतं. यामध्ये काहीही होऊ शकलं असतं. तेव्हा माझ्या अनेक विचार आले.”
कविरत स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीत हार्दिकनं सांगितलं, “२००५ साली माझा हा अपघात झाला होता. या अपघातात झालेल्या जखमेवर नंतर तीन वर्षांनी नवीन त्वचा आली. ती त्वचा येतानासुद्धा मी पाहिली आहे. या अपघातानंतर ‘मी लंगडा होणार’, ‘मला चालता येणार नाही’, असे अनेक विचार माझ्या मनात आले होते. पण त्यावेळी धीर द्यायला माझी आई कायम माझ्याबरोबर होती. तसंच त्यावेळी माझा भाऊसुद्धा माझ्या पाठीशी ठामपणे उभा होता.”
हार्दिक जोशी इन्स्टाग्राम पोस्ट
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेनंतर हार्दिक झी मराठीवरीलच ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. तसंच त्यांनं झी मराठीवरीलच ‘जाऊ बाई गावात’सारखा शोसुद्धा होस्ट केला आहे. याशिवाय हार्दिक ‘हर हर महादेव’, ‘नवरदेव बीएससी. अॅग्री’, ‘लॉकडाउन’ लग्न’, ‘धर्मवीर २’ अशा सिनेमांतूनहे प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच त्याचा ‘अरण्य’ नावाचा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.