मुंबई : गेल्या काही वर्षांपासून असलेली दाक्षिणात्य चित्रपटांची पकड दूर सारून यंदा हिंदी आणि मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर वर्चस्व मिळवले. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘ट्वेल्थ फेल’ या चित्रपटाला ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचे सुवर्ण कमळ जाहीर करण्यात आले तर, मराठी चित्रपट ‘आत्मपॅम्फ्लेट’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाकरिता आशिष बेंडे यांना पारितोषिक जाहीर करण्यात आले. नाळ २, श्यामची आई, जिप्सी अशा चित्रपटांनाही राष्ट्रीय पुरस्कारांत स्थान मिळाले आहे.

अभिनेता शाहरूख खान याला ‘जवान’ पुरस्कारासाठी जाहीर झालेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हेदेखील यंदाच्या पुरस्कारांचे वैशिष्ट्य आहे. शाहरूखला ३३ वर्षांनंतर हा पुरस्कार मिळाला असून तो त्याला ‘ट्वेल्थ फेल’मध्ये मुख्य भूमिका करणाऱ्या विक्रांत मसी याच्याबरोबर विभागून देण्यात आला. राणी मुखर्जी हिला ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली येथील मीडिया सेंटर येथे शुक्रवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांसाठी २०२३ साली सेन्सॉर बोर्डाचे प्रदर्शन प्रमाणपत्र मिळवणाऱ्या चित्रपटांचा विचार करण्यात आला. यंदा हिंदी चित्रपटांनी महत्वाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. आयएएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि श्रद्धा जोशी-शर्मा यांच्या संंघर्षमय यशाची कहाणी या चित्रपटात मांडली आहे. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय मनोरंजक चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ (सुवर्ण कमळ पुरस्कार), सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय, सामाजिक चित्रपट ‘सॅम बहादूर’ (रजत कमळ पुरस्कार), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन (सुवर्ण कमळ पुरस्कार) असे महत्वाचे पुरस्कार हिंदी चित्रपटांनी मिळवले आहेत. प्रचारपटाच्या धाटणीचे आत्मचरित्रपट वा वास्तव घटनांवर आधारित चित्रपटांना गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हमखास स्थान मिळते. यंदाही ‘द केरला स्टोरी’ आणि ‘सॅम बहादूर’ या चित्रपटांना मिळालेल्या यशाने ही बाब अधोरेखित केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतही चैतन्य

गेल्या दोन वर्षांत विभागीय पुरस्कारांखेरीज आपली छाप न पाडू शकलेल्या मराठी चित्रपटांनी यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांत लक्षवेधी यश नोंदवले. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण चित्रपटासाठी सुवर्ण कमळ पुरस्कार ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक आशिष बेंडे यांना जाहीर झाला. याशिवाय, सर्वोत्कृष्ट बालचित्रपटासाठीचा सुवर्ण कमळ पुरस्कार सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ २’ चित्रपटाला जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा रजत कमळ पुरस्कारही ‘गांधी तथा चेट्टू’ या तेलुगू चित्रपटासह ‘जिप्सी’ या मराठी चित्रपटासाठी कबीर खंदारे याला आणि ‘नाळ २’साठी त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांना विभागून जाहीर झाला आहे.सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा रजत कमळ पुरस्कार ‘सॅम बहादूर’ या चित्रपटासाठी वेषभूषाकार दिव्या आणि निधी गंभीर यांच्यासह मराठी वेशभूषाकार सचिन लोवलेकर यांनाही जाहीर झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘श्यामची आई’ तेव्हाही, आताही…

सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटांसाठीचा रजत कमळ पुरस्कार जाहीर झाला आहे. १९५४ साली आचार्य अत्रे दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटाने पहिल्याच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठी सुवर्ण कमळ पुरस्कार जिंंकत इतिहास घडवला होता. आज ७१ वर्षांनी याच ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये नव्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळवत या कलाकृतीचा लौकिक कायम राखला आहे.