नाटक पाहताना ‘ब्लॅकआऊट’ झाल्यावर अंधाऱ्या विश्वात रंगभूमीवरचं जग बदललेलं पाहायला मिळतं. पडद्यामागे ही किमया साधणाऱ्या चेहऱ्यांना ना प्रसिद्धी मिळते, ना जास्त पैसा. पण नाटकाच्या प्रेमापोटी ही मंडळी पडेल ते काम करायला तयार होतात. या मंडळींची एक मोट बांधून त्यांना सांभाळण्याचं काम करतात ते ठेकेदार. नाटक पाहणाऱ्या रसिकांना कदाचित या गोष्टी माहीत नसतात. ‘विंग बिंग’मधून खास या अनोळखी चेहऱ्यांच्या विश्वात डोकावण्याचा हा प्रयत्न.

पूर्वी प्रत्येक नाटय़ संस्था नाटकांचं नेपथ्य स्वत:जवळ ठेवायची. पण कालांतराने त्यांना ही जबाबदारी पेलवताना काही समस्या जाणवायला लागल्या. त्या वेळी नाटय़ क्षेत्रात ठेकेदारांचा उदय झाला. नेपथ्यासाठी नाटय़ संस्था या ठेकेदारांशी करार करतात. नेपथ्यनिर्मितीपासून ते गोदामातील नेपथ्य नाटय़गृहापर्यंत आणण्यापर्यंत, त्यानंतर नेपथ्य उभारण्याचं, नाटकादरम्यान नेपथ्य बदलण्याचं आणि नाटक झाल्यावर नेपथ्य काढून गोदामापर्यंत नेण्याचं काम बॅकस्टेजची मंडळी करीत असतात. पण हे सर्व नियोजित पार पाडण्याची जबाबदारी असते ती ठेकेदारांची.

उल्हास सुर्वे हे जवळपास ३५ र्वष रंगभूमीशी निगडित काम करीत असले तरी १७ वर्षांपासून ते ठेकेदारीचा व्यवसाय करतात. सतीश दुभाषी आणि भक्ती बर्वे यांचे ‘अरे चोरा’ हे त्यांचं पहिलं नाटकं. ‘अष्टविनायक’चे दिलीप जाधव यांच्याकडे त्यांनी २५ वर्ष काम केलं. त्याचबरोबर ‘चिंतामणी प्रॉडक्शन’ आणि दिनू पेडणेकर यांच्याकडची ठेकेदारीची कामं त्यांच्याकडे असतात.

‘माझ्याकडे सध्याच्या घडीला १५ माणसं आहेत. हे काम फारच धकाधकीचं आहे. १० दिवसांमध्ये नेपथ्य बनवावं लागतं. त्यानंतर नेपथ्याची वाहतूक आणि बदल आमच्याच मुलांना करावे लागतात. कपडेपट, संगीत, प्रकाशयोजना यांना नाटकापुरतंच काम असलं तरी आमची मेहनत त्यांच्यापेक्षा दुपट असते. नाटकादरम्यान जास्त बदल असतील तर तेही आम्हालाच करावे लागतात. ‘तू तू मी मी’ नाटकामध्ये तब्बल ३६ नेपथ्यबदल आहेत. त्या वेळी काम करताना फार मेहनत लागते. पण त्या मोबदल्यात या कामगारांना मिळणारं मानधन फारच कमी आहे. पूर्वी दिवसाला नाटकाचे २-३ प्रयोग व्हायचे, पण आता नाटक शनिवार-रविवापर्यंतच मर्यादित राहिल्याचे दिसते. त्यामुळे रोजंदारीवर असलेल्या या लोकांची मिळकतही कमी झाली आहे. फक्त नाटकाचं वेड पूर्ण करता येतं, म्हणूनच ही मंडळी हे काम करतात,’ असं उल्हास सुर्वे सांगत होते.

या ठेकेदारांच्या समस्या बऱ्याच, पण त्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नाही. नाटकाची तालीम महिनाभर चालते, पण नाटकाच्या नेपथ्यनिर्मितीला जास्तीत जास्त दहा दिवसांचा कालावधी दिला जातो, तो अपुराच आहे. त्याचबरोबर नाटकादरम्यान जे बदल करायचे असतात ते दाखवण्यासाठी बॅकस्टेज कर्मचाऱ्यांना १-२ प्रयोगांचीच तालीम दिली जाते. दादरच्या स्वा. सावरकर स्मारक येथे प्रयोग असला तर चौथ्या माळ्यापर्यंत सामान न्यावं लागलं. ठाणे, बोरिवली, कल्याण, पुणे या ठिकाणची नाटय़गृहं बांधताना नेपथ्याच्या सामानांचा विचारच केला गेलेला नाही. एका प्रयोगानंतर दुसरा प्रयोग करायचा असेल तर किमान अर्धा तास तरी वेळ जातो. एका नाटकाचं नेपथ्य बाहेर गेल्याशिवाय दुसऱ्या नाटकाचं नेपथ्य नाटय़गृहात येऊ शकत नाही. नाटय़गृहात नेपथ्य आल्यावर ते उभारण्यासाठी काही निश्चित कालावधी लागतो. आणि यामध्ये जर प्रयोगाला उशीर झाला तर ठेकेदारांवर खापर फोडलं जातं. पण मूळ प्रश्नांकडे कुणाचंच लक्ष नसतं.

मोहन वाघ यांच्या ‘चंद्रलेखा’मध्ये वाहक असलेले प्रकाश परब आता ठेकेदारीचा व्यवसाय करतात. दत्ता घोसाळकर यांनी ‘यदा-कदाचित’ हे नाटक परब यांच्याकडे पहिल्यांदा सुपूर्द केलं, तेव्हापासून परब या व्यवसायात आहेत. आतापर्यंत जवळपास २०० नाटकं त्यांनी केली आहे. ‘अष्टविनायक’, ‘भद्रकाली’, ‘माऊली’ या कंपन्यांबरोबर त्यांनी कामं केली आहेत, त्याचबरोबर महेश मांजरेकर, अजित भुरे, राहुल भंडारे या व्यक्तींच्या संस्थांबरोबरही परब यांनी प्रयोग केले आहेत.

‘ठेकेदारी या व्यवसायात शांत झोप कधीच येत नाही. प्रत्येक क्षणी तुमच्यावर दडपण असतं. सध्याच्या घडीला माझ्याकडे ३० माणसं आहेत. ‘यदा कदाचित’पासून ते आता ‘गेला उडत’पर्यंत बऱ्याच नाटकांचे प्रयोग मी केले. सध्याच्या घडीला ‘गेला उडत’ या नाटकामध्ये जवळपास पाच मिनिटांनी नेपथ्यबदल होतो, त्या वेळी जास्त माणसांसहित डोळ्यात तेल घालून काम करावं लागतं. पण बऱ्याचदा नेपथ्यनिर्मितीला आणि नाटकांतले बदल आत्मसात करायला आम्हाला कमी वेळ दिला जातो. त्याबरोबर नाटय़गृहांमध्ये एकाच वेळेला दोन कंपन्यांच्या नेपथ्याच्या गाडय़ा लागू शकत नाहीत. त्यामुळे नाटक सुरू व्हायला उशीर होतो आणि खापर मात्र आमच्यावर फोडलं जातं. कधी कधी हा व्यवसाय सोडावा असं वाटतं, पण ३० माणसं सांभाळायची जबाबदारी घेतली आहे त्याचं काय? हा प्रश्न पडतो. एकंदरीत या ठेकेदारी आणि बॅकस्टेजच्या कामांमध्ये मेहनत जास्त आणि पैसा कमी, अशी स्थिती आहे. काही निर्माते या पडद्यामागच्या कलाकारांना धनादेश देतात, ही सर्वात चांगली गोष्ट आहे. त्यामुळे त्यांचा सर्व पैसा थेट घरी जातो. यासारख्या बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत,’ असं परब सांगत होते.

सुर्वे, परब यांच्यासह प्रवीण गवळी, प्रसाद वालावलकर, सुरेश सावंत, रवी सावंत, अशोक पालेकर, महेश शिंदे ही मंडळी ठेकेदारीची कामं करतात. पडद्यामागच्या कलाकारांना मुलासारखं वागवतात, पण सरतेशेवटी हाती पैसा फारच कमी पडतो. पडद्यामागच्या कलाकारांना दिवसाचे ५५० रुपये दिले जातात, तर रात्री प्रयोग असेल तर जेवणाचा १०० रुपये भत्ता दिला जातो. हे पैसे जेव्हा प्रयोग असतील त्याच दिवसाचे, प्रयोग नसेल त्या दिवशी काय करायचं? हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. जर एखादं नाटक फसलं तर हातावर पोट असणाऱ्या या कलाकारांच्या पदरी काहीच पडत नाही. एका प्रयोगासाठी जिथे नटासहित काही तंत्रज्ञांना ३-५ तास द्यावे लागतात, तिथे हे पडद्यामागचे कलाकार १२ तास काम करीत असतात. पण मानधनात अपेक्षित वाढ होणार कधी, याचीच वाट ते पाहत आहेत. नाटकाला व्यावसायिक यश मिळालं तर निर्मात्यासह पडद्यावरच्या कलाकारांना अमाप पैसे मिळतात, पण या ठेकेदार आणि पडद्यामागच्या कलाकारांचं काय? त्यांच्या आयुष्यात अच्छे दिन कधी येणार, याचा विचार निर्मार्त्यांनी करायला हवा.

प्रसाद लाड – prasad.lad@expressindia.com