बॉलिवूड जगतात पूर्वी रोमान्स दाखविण्याची पद्धत आणि आताच्या घडीला दिसणारा रोमान्स यात फारच बदल झाल्याचे दिसून येते. बॉलिवूडमध्ये एकवेळ अशी होती की नायक-नायिका यांच्यातील रोमान्स दाखविण्यासाठी इंद्रधनुष्याचे बदलणा-या रंगातून प्रेमाची भावना व्यक्त केली जायची. बागेतील दोन फुले एकमेंकाच्या जवळ आल्याचे दाखवत दिग्दर्शक प्रेम फुलत असल्याचे दाखवायचे. प्रेक्षकही पडद्यावर टीपणारा भाव सहज समजून जायचे. एव्हर ग्रीन म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार यांनी ‘मुघल ए आझम’ पासूनच्या चित्रपटांमध्ये बॉलिवूडमधील प्रणय दृश्यांना एका वेगळ्या अंदाजात सादर करण्यात आले. ‘श्री ४२०’ या चित्रपटामध्ये राज कपूर हे नर्गिससोबत एका हटके अंदाजात प्रेम व्यक्त करताना दिसले. रिमझिम बरसणारा पाऊस आणि सोबत छत्रीच्या आडोश्याला रंगलेला प्रणय एका वेगळ्या अंदाजात ‘प्यार हुआ इकरार हुआ’… म्हणत प्रेमाची एक वेगळी झलक या गीतातून त्यांनी दाखवून दिली. त्यानंतर याच जोडीने ‘चोरी चोरी’ या चित्रपटातून ‘ये रात भिगी भिगी’…या गाण्याने बॉलिवूड चित्रपटातील प्रणय बदलत असल्याचे संकेत दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानंतर सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या ‘रुप तेरा मस्ताना’ या गाण्यातून बॉलिवू़डमधील प्रणय अधिक खुलेपणाणे समोर येण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या पडद्यावरील प्रणय दृश्यावेळी राजेश खन्ना यांनी शर्टाची बटने काढून दृश्यामध्ये एक वेगळा रंग भरला होता. अर्थात सलमान खान आता प्रत्येक चित्रपटात शर्ट काढताना दिसत असला तरी राजेश खन्ना यांचे हे गाणे पाहणारा सलमानपूर्वी बॉलिवूडमध्ये असा अंदाज राजेश खन्ना यांनी दाखवून दिल्याचे दिसते. जितेंद्र आणि लिना हे बॅडमिंटन कोर्टवर प्रेम व्यक्त करताना दिसले. त्यानंतर ‘हाय रे हाय निंद नहीं आये’… या सूरात दोघांनी एका वेगळ्या अंदाजात प्रेम व्यक्त केले.

ऋषि कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्या ‘बॉबी’ चित्रपटावेळीचा रोमान्स चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. १९७० ते ८० च्या दशकात अँग्री मॅन म्हणून ओळख निर्माण केलेल्या अमिताभ बच्चन यांनी ‘जंजीर’ आणि ‘दिवार’ या चित्रपटातील आपल्या भूमिकेमध्ये बदल करत रेखासोबत केलेला प्रेमाचा ‘सिलसिला’ प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. अमिताभ यांनी बॉलिवूडमध्ये झिनत अमान, परवीन बाबी आणि रेखा यांच्यासोबतच्या प्रणयदृश्यांना चांगलीच पसंती मिळाली. बॉलिवूडमधील हवाहवाई श्री देवी आणि अनिल कपूर यांच्यातील ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील गीतातूनही प्रेक्षकांना प्रणयाचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला. दरम्यान विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांच्यातील ‘आज फिर प्यार आया है.. ‘ गाण्यातील प्रणयदृश्ये ही प्रेक्षकांना तोंडात बोट घालण्यास प्रवृत्त करणारे असेच होते.

आजच्या घडीला बॉलिवूडच्या पडद्यावरील प्रणय दृश्यांनी सीमा ओलांडल्याचे दिसत आहे. अभिनेत्री बिनधास्तपणे प्रणयदृश्य देताना दिसतात. जॉन अब्राहम आणि बिपाशा यांच्यातील ऑनस्क्रिन केमिस्ट्री, इम्रान हाश्मीसोबत कोणत्याही अभिनेत्रीने केलेली प्रणयदृश्यं किंवा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ओके जानू’ चित्रपटातील श्रद्धा कपूर आणि आदित्य राय कपूर यांनी ‘हम्मा हम्मा’ या गाण्यातील प्रणयाने बॉलिवूडमधील रोमान्समध्ये बदल झाल्याचे दिसते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentines day 2017 no more afraid kiss and tell how bollywoods romance changed with time
First published on: 14-02-2017 at 12:32 IST