फ्लॅशबॅक : हिंदीतील वाटचालीचा रौप्यमहोत्सवी ‘वर्षा’व

वर्षा उसगावकरची हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी पचंवीस अर्थात रौप्यमहोत्सवी वाटचाल एक स्वतंत्र आणि कौतुकाचा विषय!

varsha usgaonkar, naseeruddin-shah
वर्षा उसगावकर आणि नासीरुद्दीन शाह

dilip thakurवर्षा उसगावकरची हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी पचंवीस अर्थात रौप्यमहोत्सवी वाटचाल एक स्वतंत्र आणि कौतुकाचा विषय! मराठीत ती अभिनय, नृत्य, आत्मविश्वास, सहज वावर आणि गोव्याची असल्याने वेगळे वलय या गुणांवर लोकप्रिय झाली. या साऱ्याच्या मिश्रणातून तिच्या खुललेल्या व्यक्तिमत्वाचा हिंदी चित्रपटसृष्टीत जास्त उपयोग होईल अशा मराठी रसिक मनाच्या शुभेच्छांसह ती हिंदीत झेपावली. ‘शिकारी’ (नटराज स्टुडिओतील या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळची वर्षा आजही स्पष्ट आठवतेय.) ‘सोने की लंका’, ‘सोने की जंजीर’, ‘हनिमून’ आणि ‘तिरंगा’ असे काही चित्रपट मिळवत तिने हिंदी चित्रपटसृष्टीत धडाक्यात पाऊल टाकले. ‘दूध का कर्ज’, ‘दिलवाले कभी ना हारे’, ‘हस्ती’ अशी तिच्या चित्रपटांची संख्या वाढली. इंग्रजी गॉसिप्स मॅगझिन्ससाठी फोटो सेशनमधून हवा असणारा धीटपणा वर्षाच्या स्वभावात होताच. ती फोटोसेशन आकर्षकदेखील ठरली. अर्थात हिंदीतील व्यावसायिक गरजा आणि गणिते ही नेमकी नसतात. चित्रपटाच्या यशापयशानुसार ती बदलतात. वर्षाने ‘दुश्मनी’, ‘खलनायिका’ अशा चित्रपटातून पाहुणी अभिनेत्री म्हणून नृत्ये साकारली. ‘महाभारत’ मालिकेत भूमिका साकारत हिंदीतील प्रभाव वाढवला. मिथुन चक्रवर्तीसोबतचा ‘त्रिनेत्र’ हा चित्रपट तिने त्यात थोडे अधिक एक्स्पोजर असल्याने नाकारला. कारण तेव्हा आजच्याइतका सांस्कृतिक मोकळेपणा नव्हता. रवीन्द्र पीपट दिग्दर्शित ‘लाल दुप्पट्टा मलमल’ का हा व्हिडिओपट तिने नाकारला नसता तर ती छोट्या पडद्यावरची शेखर सुमन झाली असती. काही असो हिंदीतील मराठी अभिनेत्रींचा धांडोळा घेताना त्यात वर्षा उसगावकर हे नाव पहिल्या काही जणीत निश्चित असेल. त्या प्रवासाने पंचवीस वर्षाचा कालखंड ओलांडलाय. त्याची दखल घ्यायला हवीच…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Varsha usgaonkar bollywood journey