देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणारी करोनाची रुग्णसंख्या चिंताजनक आहे. अशात प्रशासनाकडून मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं, गर्दी न करण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे. अभिनेता वरुण धवनने आपल्या चाहत्यांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
अभिनेता वरुण धवन सध्या अरुणाचल प्रदेशातल्या झिरो या परिसरात त्याच्या ‘भेडिया’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. त्याच्या चित्रीकरणाच्या सेटवर त्याला भेटण्यासाठी काही चाहते आले होते. त्यावेळी तो चाहत्यांना संबोधित करतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणतो, “मलाही वाटतं की मी मास्क काढावा, सर्वांना मिठी मारावी, हातात हात द्यावा पण मला सुरक्षित आणि जबाबदार व्हायला हवं. म्हणूनच सर्वांनी मास्क वापरा.”
या व्हिडिओत तो चाहत्यांना हात जोडून ही विनंती करताना दिसत आहे.
View this post on Instagram
मार्चमध्येही वरुणच्या चाहत्यांनी त्याला भेटण्यासाठी त्याच्या चित्रीकऱणाच्या सेटवर गर्दी केली होती. त्यामुळे चित्रीकरण काही काळासाठी थांबलं होतं. यावेळी वरुणला गाडीच्या छतावर चढून त्याच्या चाहत्यांशी संवाद साधावा लागला होता. त्यावेळी तो म्हणाला होता, “थोड्या वेळासाठी आम्ही सर्वजण इथे आहोत. अजून वेळ आहे. त्यामुळे जेव्हा चित्रीकरण संपेल त्यावेळी मी तुम्हा सर्वांना भेटू शकेन.”
वरुण सध्या ‘भेडिया’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. अरुणाचल प्रदेशात हे चित्रीकरण सुरु आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेनन दिसणार आहे. हा चित्रपट दिग्दर्शक विजय दिवाणच्या ‘स्त्री’ आणि ‘रुही’ या चित्रपटांच्या मालिकेतलाच एक असणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केलं आहे. या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, दिपक डोब्रियाल हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचं लेखन निरेन भट यांचं असून त्यांनी या पूर्वी ‘बाला’ आणि ‘मेड इन चायना’ या चित्रपटांसाठीही लेखन केलं आहे.
वरुण आणि या चित्रपटाची संपूर्ण टीम गेल्या काही आठवड्यांपासून अरुणाचल प्रदेशात आहे. त्यांनी गेल्या महिन्यात रंगपंचमीही एकत्र साजरी केली. वरुणची पत्नी नताशा दलालही चित्रीकऱणाच्या ठिकाणी आली होती.