ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र बुधवारी पहाटे त्यांचं निधन झालं. आज संध्याकाळी पाच वाजता मुंबईमध्ये दिलीप कुमारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्या कारणाने जून महिन्यात रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. यावेळी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटोदेखील शेअर करत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. उपचारानंतर पाच दिवसांनी दिलीप कुमार यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.

दिलीप कुमार यांनी ‘ज्वार भाटा’ या सिनेमातून १९४४ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून उतरवलं आणि पुढची अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. ‘बाबूल’, ‘दीदार’ ‘आन’ ‘गंगा-जमुना’, ‘मधुमती’, ‘देवदास’ अशा कितीतरी सिनेमांची नावे घेतला येतील.

पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी ‘मुगल-ए-आजम’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘राम और श्याम’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘मुगल-ए-आजम’ मधील सलीमप्रमाणेच ‘देवदास’ चित्रपटातील त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतो.

देवदास ही बंगाली लेखक शरतचंद्र यांची कादंबरी. बालमैत्रीण पारोवर प्रेम असूनही तिच्याशी लग्न न करता आलेला आणि त्यानंतर दारूच्या नशेत आकंठ बुडालेला, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पारोचा ध्यास घेतलेला ‘देवदास’ दिलीप कुमार यांनी ज्या तन्मयतेने रंगवला त्याला खरोखरच जवाब नाही. १९९८ मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran bollywood actor dilip kumar passes away at the age of 98 sgy
First published on: 07-07-2021 at 07:57 IST