Poonam Pandey Play Mandodari role in Ramleela: बोल्डनेस आणि प्रसिद्धी स्टंटसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे यावेळी वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आली आहे. दिल्लीतील प्रसिद्ध लव कुश रामलीलामध्ये रावणाची पत्नी मंदोदरीचे पात्र पूनम पांडे साकारणार आहे. दिल्लीतील सर्वात जुन्या रामलीला समितीने पूनम पांडेला या भूमिकेसाठी आमंत्रित केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. विश्व हिंदू परिषदेने पूनम पांडेला विरोध केला असून या निर्णयामुळे सांस्कृतिक आणि धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, असे म्हटले आहे.

विश्व हिंदू परिषदेने रामलीला समितीला त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. पूनम पांडेचा भूतकाळ, तिच्याशी निगडित वाद आणि ती जे पात्र निभावणार आहे, त्यामुळे भक्तांमध्ये गोंधळ आणि नाराजी निर्माण होऊ शकते, असे विहिंपने म्हटले आहे.

विहिंपचे प्रांतीय मंत्री सुरेंद्र गुप्ता यांनी समितीला लिहिलेल्या पत्रात म्हटले, “रामलीला हा केवळ एक नाट्यप्रयोग नाही. रामलीला भारतीय मूल्ये आणि परंपरांचे जिवंत मूर्त स्वरूप आहे. रामायण आधारित नाटकासाठी कलाकार निवडताना केवळ अभिनय आणि प्रसिद्धी हा आधार नसावा. तर सांस्कृतिक योग्यता आणि भक्तांच्या भावनांचाही विचार केला जावा, असा संघटनेचा आग्रह आहे.”

सुरेंद्र गुप्ता पुढे म्हणाले, मंदोदरी ही सद्गुण, प्रतिष्ठा, संयम आणि समर्पक पत्नीचे आदर्श प्रतीक आहे. या भूमिकेसाठी या आदर्शांना प्रतिबिंबित करणाऱ्या अभिनेत्रीची निवड करायला हवी. आमचा हेतू कोणत्याही कलाकाराला वैयक्तिक विरोध करण्याचा नाही. रामायणासारख्या पवित्र अशा नाट्याचे सांस्कृतिक पावित्र्य आणि भक्तांच्या श्रद्धेचे रक्षण करणे, हा आमचा मुख्य हेतू आहे.

रावणाचे पात्र कोण निभावणार?

रावणाची पत्नी मंदोदरी हे पात्र पूनम पांडेला देण्याचा प्रस्ताव आहे. तर रावण हे पात्र अभिनेता आर्य बब्बर साकारत आहे. आर्य हा ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा असून प्रतीक बब्बरचा सावत्र भाऊ आहे. आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना आर्य बब्बर म्हणाला की, मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मला हे पात्र रंगवण्याची संधी मिळत आहे. या ऐतिहासिक पात्रामधील नकारात्मक आणि सकारात्मक या दोन्ही बाबींचा विचार करून मी हे पात्र साकारण्याचा प्रयत्न करेन.

पूनम पांडेने मानले आभार

दरम्यान रामलीला समितीने मंदोदरीची भूमिका दिल्यानंतर पूनम पांडेने एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले आहेत. तिने म्हटले, “लव कुश रामलीला समितीने मला आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. माझ्यासाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. ऐतिहासिक आणि या भव्य आयोजनाचा भाग बनण्याची संधी मला प्राप्त होत आहे. रामलीला हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नाही तर आपल्या संस्कृती आणि परंपरेचा उत्सव आहे. मी पूर्ण श्रद्ध आणि उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी होण्याची वाट पाहत आहे.”