अभिनेता विकी कौशल मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. अभिनेता कतरिना कैफशी लग्न केल्यानंतर विकी काही दिवसांतच पुन्हा आपल्या कामावर परतला आहे. त्यानं त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवातही केली आहे. आगामी काळात विकीकडे बरेच चित्रपट आहेत. पण फार कमी लोकांना माहीत आहे की, अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘८३’ चित्रपटातही विकी कौशल एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार होता. त्यानं या चित्रपटासाठी ऑडिशनही दिली होती.


इ-टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार विकी कौशल ‘८३’ या रणवीर सिंहच्या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार होता. एवढंच नाही तर त्यानं या चित्रपटासाठी ऑडिशनही दिली होती. विकीनं या चित्रपटातील मोहिंदर अमरनाथ यांची भूमिका साकारावी असं दिग्दर्शक कबीर खानला वाटत होतं. पण दरम्यानच्या काळात असं काही झालं की विकीच्या जागेवर त्या भूमिकेसाठी साकिब सलीमची निवड करण्यात आली.


मिळालेल्या माहितीनुसार विकी कौशलनं ‘८३’साठी विकीनं त्याचा ‘राजी’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी ऑडिशन दिली होती. पण नंतर हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि विकीनं ही भूमिका साकारण्यास नकार दिला. त्याला या चित्रपटात सह-कलाकाराची भूमिका साकारयची नव्हती. त्यामुळे कबीर खानची इच्छा असूनही विकी कौशल मात्र चित्रपटातून बाहेर पडला.


विकी कौशलनं हा चित्रपट सोडल्यानंतर कबीर खाननं मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेसाठी अभिनेता साकिब सलीम याची निवड केली. १९८३ साली जेव्हा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत वेस्टइंडिजच्या विरुद्ध खेळत होता तेव्हा मोहिंदर अमरनाथ यांनी २६ धावा काढल्या होत्या. याशिवाय त्यांनी वेस्ट इंडिजच्या ३ खेळाडूंना बादही केलं होतं. त्यामुळेच या सामन्यासाठी त्यांना ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आलं होतं.