बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे विकी कौशल. विकीने खूप कमी काळातच त्याच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. लवकरच तो ‘सरदार उधम’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. विकीने दोन दिवसांपूर्वी या चित्रपटचा टीझर त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
सरदार उधम सिंग हे एक महान स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट आहे. या ट्रेलरमध्ये त्यांनी हाती घेतलेल्या ऑपरेशनची झलक बघायला मिळते. ट्रेलरच्या सुरूवातीला कागदपत्र दाखवण्यात आली आहेत. त्यात अनेक पासपोर्ट दिसत आहेत. पुढे खोटी ओळख पत्र बनवून सरदार उधम सिंग हे इंग्लंडमध्ये जातात, त्यांच्या टार्गेटचा पाठलाग करतात. दरम्यान त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. ही रोमांचक कथा 16 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.
‘सरदार उधम’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सिरकार यांनी केले आहे. तर राइजिंग सन फिल्म्सने किनो वर्क्सच्या सहकार्याने या अॅमेझॉन ओरिजिनल मूव्हीची निर्मिती केली आहे. विकी कौशलने हा ट्रेलर त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत, “सरदार उधम ऑफिशियल ट्रेलर,एक अशा माणसाची कथा ज्याला आपण कधीच विसरू शकत नाही. यांच्या प्रवासाची कथा अतुलनीय आहे. ही गोष्ट आहे एका क्रांतिकारकाची.”, अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.