प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ या चित्रपटातील ऐतिहासिक भूमिकेनंतर आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अगदी आजच्या काळातील तरुणीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विक्कीची भूमिका करते आहे. कॉमिक विश्व आणि रहस्यपट अशा दोन वेगळ्या गोष्टींना एकत्र आणत केलेल्या सौरभ वर्मा दिग्दर्शित ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटात सोनाली मुख्य भूमिकेत आहे. अभिनेत्री म्हणून कारकीर्दीच्या या टप्प्यावर जेव्हा आपल्यासाठी भूमिका लिहिल्या जातात, तेव्हा होणारा आनंद वेगळा असतो आणि तो या चित्रपटाने मिळवून दिला, असे सोनालीने सांगितले.
‘हम्पी’ या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान दिग्दर्शक सौरभ वर्मा यांच्याशी भेट झाली होती. त्या वेळी ते मला म्हणाले, तुला डोळ्यासमोर ठेवून ‘विक्की वेलिंगकर’ या सिनेमाची कथा लिहिली आहे आणि तू जर या सिनेमासाठी नाही म्हणाली तर हा सिनेमा बनवला जाणार नाही. हे ऐकल्यानंतर मी भारावून गेले. एखाद्या कलाकारासाठी ही खूप मोठी आनंदाची बाब आहे. अशा पद्धतीने मला पहिल्यांदा कोणी तरी विचारणा केली होती, त्यामुळे खूप छान वाटलं असं तिने सांगितलं. ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलताना यात ती विक्की या कॉमिक आर्टिस्टची भूमिका करत असल्याचे तिने सांगितले. ती कॉमिक्स लिहिते, व्यक्तिरेखा डिझाइन करते. तिला या जगात राहायला-रमायला आवडतं. वास्तव आयुष्यात ती तिच्या वडिलांचा दुर्मीळ स्वरूपाच्या घडय़ाळांचा व्यवसाय चालवते आहे. ती या व्यवसायातही फार यशस्वी ठरत नाही आहे आणि तिच्या कॉमिक्सपण विकल्या जात नाही आहेत. त्यामुळे पूर्णपणे अपयशी अशी एक सर्वसामान्य मुलगी एका असामान्य परिस्थितीमध्ये अडकते, ती त्यातून बाहेर पडते का? हे या चित्रपटातून पाहायला मिळेल, असे सोनालीने सांगितले.
‘हिरकणी’तील हिरानंतर विक्कीच्या भूमिकेत प्रवेश करताना वेळ लागला का, या प्रश्नाला उत्तर देताना ‘हिरकणी’ सिनेमासाठी मी वर्षभर तयारी करत होते, तीन वर्ष या सिनेमाचं काम सुरू होतं. त्यानंतर वर्षभर कथेचं वाचन, वेगवेगळं प्रशिक्षण सुरू होतं. मी वर्षभर हिरकणीच्या भूमिकेमुळे पार्लरला गेले नव्हते, मग जानेवारी-फेब्रुवारीमध्ये हिरकणीचं चित्रीकरण केलं. त्यानंतर लगेच ‘धुरळा’चं चित्रीकरण पूर्ण केलं. तिथून परत मुंबईला आल्यावर ‘हिरकणी’चं राज्याभिषेकाचं गाणं चित्रित झालं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ‘विक्की वेलिंगकर’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली. त्यामुळे मला या भूमिकेच्या तयारीसाठी वेळच मिळाला नाही, मात्र ज्या दिवशी ‘हिरकणी’च्या गाण्याचं चित्रीकरण संपवलं त्याच दिवशी संध्याकाळी मी पार्लरमध्ये जाऊन माझे केस हिरव्या रंगाने रंगवले, असं ती सांगते. अर्थात, पार्लरला जाऊन हिरव्या रंगात केस रंगवणं ही भूमिकेची आणि दिग्दर्शकाची गरज होती हेही तिने हसत हसत स्पष्ट केलं.
विक्कीची भूमिका करताना पहिल्यांदाच अशा प्रकारच्या रहस्यपटात काम करत असल्याने भूमिका साकारताना खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागत होती, असं तिने सांगितलं. आपण कुठल्या प्रसंगात चेहऱ्यावर काय भाव आणत आहोत आणि त्यातून काय प्रेक्षकांसमोर काय आणि किती प्रमाणात गोष्टी उघड झाल्या पाहिजेत, याचं भान सतत ठेवावं लागतं. रहस्यपटामध्ये टप्प्याटप्प्याने गोष्टी प्रेक्षकांसमोर उलगडत जातात. त्यामुळे पटकथाही पूर्णपणे माहिती असली पाहिजे, असे ती म्हणते. या चित्रपटात ती आणि स्पृहा जोशी पहिल्यांदाच एकत्र आल्या आहेत. या चित्रपटात आम्ही दोघींनी खूप धमाल केली आहे, असं तिने सांगितलं. आम्ही पहिल्या भेटीतच छान मैत्रिणी झालो. आमचे स्वभाव खूप सारखे आहेत. ती कविता करते, खूप संवेदनशील आहे, पण त्यापलीकडे जात ती एक वेगळंच व्यक्तिमत्त्व आहे. आमचे विचार-आवडीनिवडी सारख्या आहेत आणि आम्ही दोघीही खूप फिल्मी आहोत. त्यामुळे खूप गोष्टींवर आम्ही चर्चा करतो. खूप मजा करतो आणि त्यामुळे ही मैत्री कायम टिकणारी आहे, असं सोनाली सांगते.
कारकीर्दीच्या या टप्प्यावर भूमिका निवडताना काळजी घ्यावीच लागते, असं सोनाली स्पष्ट करते. पूर्वी जेव्हा आपल्याला भूक लागत होती तेव्हा समोर ताटात जे वाढलेलं असेल ते सगळं खाल्लं जायचं आणि एकदा का आपलं पोट भरलं असेल तर मग आपण निवडून खातो किंवा नाही असंही म्हणतो, तसंच काहीसं आता झालंय, असं ती म्हणते. गेल्या काही वर्षांत मी खूप कमी सिनेमे केले आहेत. सगळ्यात आधी एखादी कथा माझ्यासमोर आली तर त्या कथेत वेगळेपण आहे का, त्यातून स्वत:ला वेगळ्या पद्धतीने सादर करता येत आहे का? भूमिका वेगळी आहे का? दिग्दर्शक कोण आहे, त्यांचा कथेविषयीचा दृष्टिकोन, निर्मितीसंस्था कोणती आणि प्रेक्षकांसमोर ती कलाकृती कशी सादर होईल, या सगळ्याचा विचार करून सिनेमा स्वीकारत असल्याचे तिने सांगितले.
अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार निर्मित व प्रणय चोकसी आणि ‘डान्सिंग शिवा’ प्रस्तुत ‘विक्की वेलिंगकर’ हा सोनालीचा चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित होतो आहे. मराठीतील हा वेगळ्या धाटणीचा रहस्यमयपट असून यात सोनालीबरोबर स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
मराठी भाषेत विविध आशयाचे दर्जेदार चित्रपट प्रदर्शित होतात. ‘नटसम्राट’, ‘कोर्ट’, ‘सैराट’ आणि ‘हरिश्चद्रांची फॅक्टरी’ सारख्या चित्रपटांमध्ये जगाला हलवून सोडण्याची ताकद आहे. दरवर्षी मराठीत विविध विषय हाताळले जातात. मराठी प्रेक्षकांना उत्कृष्ट चित्रपटांची जाण आहे. या गोष्टींमुळे मी मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनाकडे वळलो. या चित्रपटात पाश्र्वसंगीत, व्हीएफएक्स तंत्र, अभिनय, कथा मांडण्याची पध्दत नवीन असल्याने प्रेक्षकांना निश्चित आवडेल अशी माझी आशा आहे. ‘विक्की वेलिंगकर’ हा संपूर्ण कुटुंबाने पहाण्यासारखा चित्रपट आहे.
सौरभ वर्मा, दिग्दर्शक – विक्की वेलिंगकर