‘अनान’ या आगामी मराठी चित्रपटातील भगवान शंकरांच्या द्विभुज स्वरुपाचे दर्शन घडवणारे ‘तांडव’ गाणं नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. ‘गंधी सुगंधी’ आणि ‘एक सूर्य तू’ या दोन्ही हिट गाण्यांनंतर आता ओंकार शिंदे आणि प्रार्थना बेहेरे या नवीन दमदार जोडीचा नृत्याविष्कार आपल्याला या तांडव गाण्याद्वारे पाहायला मिळणार आहे.

वाचा : जाणून घ्या, श्रेयस तळपदेच्या ‘पोस्टर बॉईज’ची पहिल्या दिवसाची कमाई

शिव रुद्र आणि शिव नटराज असे तांडवाचे दोन प्रकार म्हणजेच भगवान शिव शंकरांचे रौद्ररूपाचे प्रतीक असलेले शिव रुद्र तांडव आणि त्यांच्या आनंदी क्षणातील सौम्य रूपाचे प्रतीक असलेले शिव नटराज तांडव ‘अनान’च्या निमित्ताने पाहायला मिळणार आहेत. तोडीस तोड असलेल्या ओंकार शिंदे आणि प्रार्थना बेहेरेच्या उत्कृष्ट असे सदाबहार नृत्य आपल्याला पाहता येणार आहे.

‘अनान’ चित्रपटातील इतर सर्व गाण्यांप्रमाणेच ‘तांडव’ देखील दिग्दर्शक राजेश कुष्टे यांच्या लेखणीतून अवतरलेले असून सौरभ–दुर्गेश या संगीतकार जोडीने ते संगीतबद्ध केले आहे. तर स्वराधीपती रवींद्र साठे यांच्या मधुर स्वरांनी त्याला साद घातली आहे.

वाचा : वाढदिवसाच्या औचित्यावर अक्षयचे चाहत्यांना ‘गोल्ड’ गिफ्ट

‘रोहन थिएटर्स’ चे रौनक भाटीया आणि हेमंत भाटीया यांनी ‘अनान’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन राजेश कुष्टे यांनी केलेलं आहे तर, पटकथा–संवाद राजेश कुष्टे आणि मुकेश जाधव यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचं संकलन सेजल पेंटर यांनी केलं असून छायाचित्रण राज कडूर यांनी केलं आहे.