Amitabh bachchan Deewar Kissa : महानायक अमिताभ बच्चन यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. बॉलीवूडमध्ये करियर करत असताना अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात अनेक चांगल्या-वाईट घटना घडल्या.
बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘शोले’, ‘दीवार’, ‘नमक हराम’, ‘बागबान’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले.
बिग बींचा ‘अँग्री यंग मॅन’ अवतार आणि डायलॉग बोलण्याची पद्धत आणि शैली अतुलनीय होती. त्यांनी त्यांच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांना खूप हसवले आणि रडवले आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला त्यांची आई तेजी बच्चन यांच्याशी संबंधित एक किस्सा सांगत आहोत, जेव्हा थिएटरमध्ये अमिताभ यांच्या मृत्यूचे सीन पाहून त्या खूप रडू लागल्या आणि अमिताभ अस्वस्थ झाले होते.
खरंतर, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आईशी संबंधित या घटनेचा उल्लेख ‘कौन बनेगा करोडपती’ या टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये केला होता, ज्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना बरीच जुनी आहे, जी बिग बी राजकुमार रावबरोबर शेअर करतात. यादरम्यान ते सांगतात की, जेव्हा ते त्यांच्या आई तेजी बच्चन यांना त्यांचा ‘दीवार’ चित्रपट दाखवण्यासाठी घेऊन गेले होते, तेव्हा त्या त्यांचा क्लायमॅक्स सीन पाहून मोठ्याने रडू लागल्या होत्या.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आईला सांगितले- मी जिवंत आहे
अमिताभ बच्चन यांनी राजकुमार रावला सांगितले, “एकदा मी माझ्या आईला माझा चित्रपट ‘दीवार’ दाखवण्यासाठी घेऊन गेलो होतो. चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये मी मरतो. तो पाहिल्यानंतर ती इतकी रडू लागली की मला खूप अस्वस्थ वाटले. २० लोक बसले होते आणि ती रडत राहिली. मी तिला थिएटरमधून बाहेर घेऊन आलो आणि तिला सांगितले की आई मी जिवंत आहे. मी समोर उभा आहे, पण ती बराच वेळ सतत रडत राहिली. हे तासनतास चालू राहिले. याचा कुठेतरी परिणाम होतो. कुटुंब हे एक मोठे नाते आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात काय घडते आणि कुटुंबात काय घडते हे खूप महत्त्वाचे बनते.” यादरम्यान, राजकुमार रावबरोबर क्रिती सेनॉनदेखील उपस्थित होती.
अमिताभ बच्चन यांचा ‘दीवार’ हा चित्रपट १९७५ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केले होते. अमिताभ यांच्याबरोबर शशी कपूर, नीतू सिंह, परवीन बाबी, इफ्तिखार, मदन पुरी, सत्येन कप्पू आणि मनमोहन कृष्णा हे मुख्य भूमिकेत होते. त्याचे बजेट सुमारे १.५० कोटी होते आणि त्याचे कलेक्शन ७.५० कोटी होते. या चित्रपटाबद्दल असे म्हटले जाते की, बिग बी यासाठी निर्मात्यांची पहिली पसंती नव्हते. यासाठी शत्रुघ्न सिन्हा हे निर्मात्यांची पहिली पसंती असल्याचे म्हटले जाते. त्या काळात शत्रुघ्न सिन्हा दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यग्र होते, ज्यामुळे हा चित्रपट बिग बींच्या हातात पडला.