वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसचा सीझन १९ सुरू होणार आहे. ‘बिग बॉस १९’चा प्रीमियर २४ ऑगस्टपासून सुरू होत आहे आणि चाहते त्याबद्दल खूप उत्सुक आहेत. अनेक सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का की एकदा दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांना बिग बॉससाठी संपर्क साधण्यात आला होता. त्यांना बिग बॉससाठी चांगली रक्कम ऑफर करण्यात आली होती.

राजेश खन्ना देखील बिग बॉसमध्ये जाण्याचा विचार करत होते, पण नंतर त्यांची प्रेयसी अनिता अडवाणी यांनी त्यांना शोची संकल्पना समजावून सांगितली. अनिता अडवाणी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले आहे की, जेव्हा राजेश खन्ना यांना बिग बॉसची ऑफर मिळाली तेव्हा ते शो करण्याचा विचार करत होते. त्यांनी अनिता यांना विचारले होते की त्यांना तिथे भांडी धुवावी लागतील का?

रील मीट्स रियलशी एका संभाषणादरम्यान अनिता म्हणाल्या की, राजेश खन्ना यांना मोठी रक्कम ऑफर करण्यात आली होती. त्या म्हणाल्या, एकदा त्यांनी मला सांगितले की जर मी बिग बॉसमध्ये गेलो तर कदाचित मी एक चांगली व्यक्ती बनू शकेन. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी म्हणाले की तो शो तुमच्या उंचीला पात्र नाही, तुम्ही अशा ठिकाणी जाऊ शकत नाही, तुम्ही खूप वेगळे आहात. मी त्यांना सांगितले की तिथे तुम्हाला घरातील कामे करायला लागतील, भांडी धुवायला लागतील. त्यांनी विचारले की ते मलाही भांडी धुवायला लावतील का? मी म्हणाले- नाही, ते तुम्हाला हे करायला सांगणार नाही. निर्माते राजेश खन्ना यांना प्रत्येक एपिसोडसाठी ३.५ कोटी रुपये फी देण्यास तयार होते, पण हे घडू शकले नाही. अनिता स्वतः बिग बॉसचा भाग राहिल्या आहेत. त्या ‘बिग बॉस ७’ चा भाग होत्या. गौहर खानने जिंकलेला हा सीझन. अनिता गेममध्ये फार पुढे जाऊ शकल्या नाही.

दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. राजेश खन्ना यांना व्यावसायिक आयुष्यात प्रचंड यश मिळालं, पण वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांना संघर्ष करावा लागला. राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडियांशी लग्न केलं होतं. लग्नानंतर काही वर्षांनी दोघांमध्ये दुरावा आला आणि ते वेगळे राहू लागले.

राजेश खन्ना व डिंपल वेगळे झाले, पण त्यांनी कधीच घटस्फोट घेतला नाही. डिंपलपासून वेगळे राहत असलेल्या राजेश खन्नांच्या आयुष्यात नंतर अभिनेत्री अनिता अडवाणी आली. राजेश खन्ना आणि अनिता अडवाणी यांचं नातं कायम चर्चेचा विषय राहिलेलं आहे.