Rajinikanth Reacted On Romancing Younger Actresses : लोकप्रिय अभिनेते रजनीकांत यांनी आजवर अनेक बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जणू घर केलं आहे. बॉलीवूडसह दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही काम केल्याने त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत
रजनीकांत यांनी आजवर अनेक कलाकारांसह काम केलं आहे. तर बऱ्याच नवीन कलाकारांना त्यांच्याबरोबर एकदा तरी काम करण्याची संधी मिळावी असं वाटत असतं. रजनीकांत यांच्या कामाची एक पद्धत आहे आणि या पद्धतीबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं. रजनीकांत यांनी त्यांच्या ‘काला’ चित्रपटाच्या म्युझिक लॉंचदरम्यान काम करण्याच्या पध्दतीबद्दल सांगितलं होतं.
‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार यावेळी रजनीकांत म्हणालेले, “ते त्यांच्यापेक्षा लहान वयाच्या अभिनेत्रींसह काम करत नाही”. ते म्हणाले होते, “मी ६५ वर्षांचा अभिनेता आहे. त्यामुळे मी माझ्यापेक्षा अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींसह रोमँटिक सीन नाही केले पाहिजे. गेल्या ४० वर्षांपासून लोक म्हणत आहेत की, माझं करिअर संपुष्टात वगैरे आलं; पण देवाच्या आणि प्रेक्षकांच्या आशीर्वादाने मी आजही काम करत आहे”.
रजनीकांत पुढे म्हणाले होते, “माझ्याबद्दल कोणी कितीही नकारात्मक बोललं, तरी मला फरक पडत नाही. माझ्या वयानुसार मला ज्या कामांसाठी विचारलं जाईल; ते मी करत राहणार”. त्यामुळेच आता वयाच्या ७४ व्या वर्षीसुद्धा ते अभिनयक्षेत्रात सक्रिय आहेत. तर लवकरच ते नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रजनीकांत यांनी याचदरम्यान सध्याच्या तरुणांबद्दलही त्यांचं मत व्यक्त केलं होतं. यावेळी त्यांच्या वक्तव्याची चर्चा झाली होती. त्यांनी सपत्नीक हजेरी लावलेल्या एका कार्यक्रमामध्ये तरुण पिढी पाश्चिमात्य संस्कृतीकडे आकर्षित होत असल्याचं सांगितलं होतं. ते म्हणालेले, “स्मार्ट फोनच्या काळात हल्लीच्या तरुण मुलांना आणि काही मोठ्या माणसांनासुद्धा आपल्या संस्कृतीबद्दल काहीच माहित नसतं आणि ते पाश्चिमात्य संस्कृतीनुसार वागतात.”
दरम्यान, रजनीकांत यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते लवकरच ‘कुली’ या चित्रपटातून झळकणार आहेत. लोकेश कनागराज यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट १४ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रजनीकांत यांच्यासह नागार्जुन, श्रुती हासन, आमिर खान, उपेंद्र राव यांसारखे कलाकारही झळकणार आहेत.