प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर आता लवकरच लवकरच त्यांचा आणखी एक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शेर शिवराज’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यानंतर आता लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या ट्रेलर लाँच सोहळ्यात सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.
दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे एकूण ८ चित्रपट अर्थात ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच अष्टकामधील चौथा चित्रपट शेर शिवराज हा चित्रपट येत्या २२ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. नुकतंच दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचा ट्रेलर किती तारखेला लाँच होणार याबाबतची घोषणा केली आहे. त्यासोबतच त्यांनी एका अनोख्या स्पर्धेचेही आयोजन केले आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता साकारणार नजरेत विखार असणारा अफजलखान; ‘शेर शिवराज’चे नवे पोस्टर प्रदर्शित
‘शेर शिवराज’ ट्रेलरची वाट पाहत होता ना, आता थेट ट्रेलर लॉन्च इव्हेंटला येण्याचीच तयारी करा! #SherShivrajContest मध्ये सहभागी होण्यासाठी ही पोस्ट नीट वाचा. तुमच्या एंट्रीजची आम्ही वाट पाहतोय, अशी पोस्ट दिग्पाल लांजेकर यांनी शेअर केली आहे. त्यासोबतच त्यांनी एका पोस्टमध्ये ही स्पर्धा नेमकी कशी असेल? यात सहभाग नोंदवण्यासाठी प्रेक्षकांना काय करावे लागेल? याबाबत सर्व माहिती त्यांनी दिली आहे.
“जावळीच्या जंगलाचा राजा एकच…”, अंगावर शहारा आणणारं ‘शेर शिवराज’चे नवं पोस्टर पाहिलंत का?
जवळपास ५० हून अधिक भाग्यवंतांना शेर शिवराज या ट्रेलर लाँच सोहळ्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे, असेही त्यांनी यात नमूद केले आहे. त्यासोबतच दिग्पाल लांजेकर यांनी येत्या ११ एप्रिल २०२२ ला या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होईल, अशीही माहिती या पोस्टद्वारे दिली आहे.
दरम्यान ‘शेर शिवराज’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या २२ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील पहिलं गाणं ‘येळकोट देवाचा’ प्रदर्शित झालं होतं. ‘यळकोट देवाचा’ हे गाणे दिग्पाल लांजेकर यांनी स्वत: लिहिलेले आहे. तर या गाण्याला आदर्श शिंदे आणि जुईली जोगळेकर या स्वरबद्ध केले आहे.