Zeenat Aman on Amitabh Bachchan’s First Shoot After His Coolie Accident : १९८३ मध्ये अमिताभ बच्चन यांचा ‘कुली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याने बॉक्स ऑफिसवर कमाल केली. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला; पण त्याच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते. शूटिंगच्या मध्यभागी ‘बिग बी’ इतके जखमी झाले होते की, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. उपचारानंतर ते बरे झाले आणि चित्रपटाच्या सेटवर परतले. त्यांची सहकलाकार झीनत अमान यांनी अलीकडेच एका पोस्टमध्ये ‘कुली’ चित्रपटाशी संबंधित एक प्रसंग सांगितला आहे.
झीनत अमान यांनी इन्स्टाग्रामवर एक जुनी स्टोरी शेअर केली आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या त्यांच्या सुपरहिट गाण्यामागील एक प्रसंग सांगितला आहे. त्यांनी बिग बींबरोबरची त्यांची केमिस्ट्री आणि सेटवरील उत्साही वातावरणाची आठवण केली. कारण- १९८२ मध्ये ‘कुली’च्या सेटवर झालेल्या जवळजवळ जीवघेण्या दुखापतीतून बरे झाल्यानंतर बच्चन यांचे ते पहिलेच शूट होते.
झीनत अमान यांनी सांगितलं, “तो काळ वेगळाच होता. ८० च्या दशकाच्या सुरुवातीला गोवा शांत, सुंदर आणि गर्दीपासून दूर होता. ‘समुंदर में नहा के’ हे गाणं आम्ही एका जवळजवळ रिकाम्या बीचवर शूट केलं. दिग्दर्शक रमेश बहल यांनी मला काही कोरिओग्राफी शिकायला सांगितली नाही; फक्त ‘सुंदर दिस’ एवढंच सांगितलं. म्हणून मी पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये लाटांमध्ये तरंगत होते आणि अमिताभ बच्चन माझ्याभोवती नाचत होते.”
पोहता येत नव्हतं; तरी ‘जलपरी’ बनले : झीनत अमान
झीनत अमान यांनी आणखी एक मजेशीर किस्सा सांगितला. “खरं सांगायचं तर मला पोहता येत नाही. त्यामुळे मला त्या शॉट्ससाठी खूप भीती वाटत होती. लाटांमध्ये काही वेळा पडले, बऱ्याचदा समुद्राचं पाणी गिळावं लागलं. पण शेवटी, मी पोहता येत नव्हतं; तरी ‘जलपरी’ बनले.”
झीनत अमान पुढे म्हणाल्या, “आमची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री नेहमीच हिट ठरली. ‘कुली’नंतर बिग बी पुन्हा सेटवर आले आणि त्यांचा तो आत्मविश्वास, ऊर्जा पाहून आम्ही सगळेच भारावून गेलो होतो. तो क्षण आमच्यासाठी भावनिकही होता.” झीनत अमान यांनी त्या काळातील गोव्याचं चित्रणही केलं. “आज जसा गोवा पर्यटकांनी गजबजलेला आहे, तसा तेव्हा नव्हता. शांत बीच, स्वच्छ वाळू आणि निवांत वातावरण… त्यामुळे शूटिंग एकदम आरामदायी वाटलं. आता मागे वळून पाहिलं की, तो काळ खरंच जादुई होता”, असं त्या म्हणाल्या.
अमिताभ यांचा अपघात
१९८२ साली बेंगळुरू येथील एका कॉलेज कॅम्पसमध्ये ‘कुली’ चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना हा अपघात घडला. एका ॲक्शन सीनमध्ये अमिताभ बच्चन यांना त्यांचा सहकलाकार पुनीत इस्सर यांच्याबरोबर एका टेबलावर उडी मारायची होती. स्क्रिप्टनुसार, ते टेबलावर पडल्यानंतर ते टेबल तुटायला हवे होते; पण सीनमध्ये चूक झाली. टेबलाच्या कोपऱ्यावर पडल्यामुळे त्यांच्या आतड्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात अमिताभ बच्चन यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्या अपघातामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी होऊन, ते कोमामध्ये गेले होते. त्यांची प्रकृती सुधारत नसल्याने डॉक्टरांनीही आशा सोडली होती. अनेक महिन्यांच्या उपचारानंतर त्यांनी मृत्यूवर मात केली आणि ते बरे झाले.