ते गाणं पाहायचीही इच्छा होत नाही; ‘धडक’मधील झिंगाट ट्रोल

गाण्याचे बोल असो किंवा कोरिओग्राफी सर्वच बाबतीत झिंगाटचं नवीन व्हर्जन फ्लॉप ठरलाय, असं मत नेटकऱ्यांनी मांडलं आहे.

janhavi kapoor, ishaan khatter
जान्हवी कपूर, इशान खट्टर
एखादं चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट होण्यामागे त्यातील गाण्यांचंही मोठं योगदान असतं. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर जितका यशस्वी ठरला, तितकीच त्यातील गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. ही गाणी आजही लोकांच्या प्ले-लिस्टमध्ये पाहायला मिळतात. ‘झिंगाट’ गाण्याने तर तरुणाईला अक्षरश: वेड लावलं होतं. आता ‘सैराट’चा हिंदी रिमेक ‘धडक’ या चित्रपटामध्ये त्याचं हिंदी व्हर्जन पाहायला मिळत आहे. अनेकांना या गाण्याबाबत उत्सुकता होती, मात्र जेव्हा हे गाणं प्रदर्शित झालं तेव्हा प्रेक्षकांची निराशाच झाली. सोशल मीडियावर या गाण्याबाबत नेटकऱ्यांनी नकारार्थी प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आणि मूळ ‘झिंगाट’ गाणंच सर्वोत्तम असल्याचं मत अनेकांनी मांडलं आहे.

उरात होतंय धडधड, लाली गालावर आली..हे मराठी झिंगाट गाण्याचे बोल तरुणाईला अगदी तोंडपाठ आहे. मात्र रिमेकच्या नादात त्याची गोडीच हरवल्याची तक्रार नेटीझन्सनी केली आहे. झिंगाटचं नवीन व्हर्जन तुम्हाला कसं वाटलं असा प्रश्न फिल्मफेअरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून विचारण्यात आला. त्यावर अनेकांनी या गाण्याला ट्रोल केल्याचं पाहायला मिळत आहे. गाण्याचे बोल असो किंवा कोरिओग्राफी सर्वच बाबतीत झिंगाटचं नवीन व्हर्जन फ्लॉप ठरलाय, असं मत अनेकांनी मांडलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Zingaat song from dhadak trolled on social media ishaan khatter janhvi kapoor