News Flash

११०. भेटवी राघवासी!

येच्या पोटी मोठं दु:ख आहे. त्या मायेवर मात करण्याचे प्रयत्न स्वबळावर अशक्य आहेत.

जगण्यात जे जे मिथ्या आहे, असत्य आहे, अशाश्वत आहे, ते ते सुटलं पाहिजे. सत्याचाच आश्रय घेतला पाहिजे. मायेच्या पोटी मोठं दु:ख आहे. त्या मायेवर मात करण्याचे प्रयत्न स्वबळावर अशक्य आहेत. बळानं विकार, वासनांचं नियमन केलं, त्यांना दडपलं तरी अंत:करणातील वासनाबीज नष्ट होत नाही. उलट ते वासनाबीज साधकाला अधोगामी बनवत त्याची घसरण सुरू करतं, हा मनोबोधाच्या २०व्या श्लोकाचा मननार्थ आपण पाहिला. यातून सुटायचं असेल तर सद्गुरूंचाच आधार हवा, हे सांगणारा मनोबोधाचा पुढचा २१वा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. हा श्लोक असा आहे:

मना वासना चूकवीं येरझारा।

मना कामना सांडिं रे द्रव्यदारा।

मना यातना थोर हे गर्भवासीं।

मना सज्जना भेटवीं राघवासी।।२१।।

प्रचलित अर्थ : हे मना, वासनेच्या योगानं येणाऱ्या जन्म-मरणांच्या येरझारा चुकव, द्रव्य आणि दारांच्या कामना सोड, गर्भवासाच्या यातना भयंकर आहेत म्हणून या यातनांतून सुटण्यासाठी हे मना, राघवाची भेट करून घे.

आता या श्लोकाचा मननार्थ पाहू. पहिले दोन चरण आहेत त्यात थोडी खुबी आहे. त्यात चुकवणं आणि सांडणं, हे शब्द दोन्ही गोष्टींना जोडले आहेत. म्हणजे हे मना वासना चुकव म्हणजे जन्म-मृत्यूच्या येरझाराही चुकतील आणि कामना सांड म्हणजे द्रव्य आणि दारांची आसक्तीही सुटेल! दारा म्हणजे पत्नी, पण व्यापक अर्थानं दारा म्हणजे वासनापूर्तीचा आधार, असा अर्थ घेता येईल. या वासना म्हणजे नुसत्या शारीरिक वासना नव्हेत, अनंत तऱ्हेच्या वासनांच्या पूर्तीसाठी मन ज्या ज्या गोष्टींवर अवलंबून आहे, त्या सर्व माध्यमांचा समावेश या ‘दारा’मध्येच आहे. आता हे पहिले दोन चरण असेही ध्वनित होतात : ‘‘मना वास ना चूकवीं येरझारा। मना काम ना सांडिं रे द्रव्यदारा।’’ यात ‘वासना’ हा शब्द ‘वास’ आणि ‘ना’ तसेच ‘कामना’ हा शब्द ‘काम’ आणि ‘ना’ असा विलगही आहे. म्हणजेच हे मना, या मायेत वास न करता जन्ममृत्यूच्या येरझारा चुकव आणि हे मना, काम अर्थात समस्त कामनांना नाकारून द्रव्य आणि दारेची आसक्ती मनातून सांड! आता हा जो ‘जन्म-मृत्यू’ आहे तोदेखील नुसता शरीराचा जन्म आणि शरीराचा मृत्यू नाही. आपल्या मनातही अनेक इच्छा जन्मत असतात आणि त्यातल्या कित्येक अपूर्त राहून मरूनही जातात. मनाच्या या ‘येरझारा’च मनाला अधिक खच्ची करणाऱ्या, मनाची शक्ती क्षीण करणाऱ्या असतात. अंतरंगाच्या गर्भात जोवर या कामना आणि वासना कायम आहेत तोवर भवदु:खाची मूळ यातना चिरंजीव आहे. यातून सुटायचं असेल तर एकच उपाय आहे! तो उपाय ‘‘मना सज्जना भेटवीं राघवासी।।’’ या चरणात सांगितला आहे! मनोबोधाच्या सुरुवातीच्या श्लोकात सज्जन या शब्दाचा अर्थ आपण भगवंताचे निजजन अर्थात संतजन असा पाहिला होता. या चरणातही हाच अर्थ आहे आणि  या श्लोकाच्या पहिल्या दोन चरणांत जसे ‘चुकवी’ आणि ‘सांडि’ हे शब्द आधीच्या आणि मागच्या अशा दोन शब्दांना जोडले आहेत तसाच इथं ‘भेटवी’ हा शब्दही सज्जनांना आणि राघवाला जोडलेला आहे! म्हणजेच, ‘‘मना सज्जना भेटवीं राघवासी।।’’ हा  चरण सांगतो की, हे मना तू सज्जनाची भेट घे.. हा सज्जनच राघवाची भेट घालून देईल! या सज्जनाचा संग लाभू दे. त्याच्या संगानं सत्याचा सदोदित सत्संग लाभावा, या तळमळीचं बीज मनात रुजू दे.. मग हाच सज्जन राघवाची भेट घालून देईल! हा राघव म्हणजे जीवनातला अज्ञानाचा अंध:कार दूर करणारा आणि सत्याचं खरं आकलन करून देणारा खरा सद्गुरूच आहे! आणि समर्थाचे सद्गुरूही राघवच तर होते!

-चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2016 4:39 am

Web Title: manobodh shlok
Next Stories
1 १०९. अधोमुख
2 १०८. मायपोटी
3 १०७. जन्मदु:ख!
Just Now!
X