14 August 2020

News Flash

७१. दृश्यप्रभाव

मनोबोधाचा हा दहावा श्लोक एक थेट प्रश्नच जणू विचारतो.

मनोबोधाचा हा दहावा श्लोक एक थेट प्रश्नच जणू विचारतो. तो असा की, आपण साधनेच्या मार्गावर, अध्यात्माच्या मार्गावर नेमकं कशासाठी आलो? जर आपण या मार्गाकडे आलो नसतो तर वाटय़ाला येणाऱ्या दु:खावर आपण कशी मात केली असती? आपल्या जीवनात अनंत अडचणी असतात, संकटे असतात. त्यांना आपण सामोरे गेलो असतोच ना? मग अध्यात्माच्या मार्गावर आलो एवढय़ा कारणावरून ती संकटे, ती दु:खंच दूर करण्याची जबाबदारी सद्गुरूंवर का ढकलावी? त्यासाठी आपण या मार्गावर आलो का? त्यासाठी आपण सद्गुरूंचे होऊ पाहातो का? ‘सदा सर्वदा प्रीती रामी धरावी’ हे जर ध्येय आहे तर मग सदा सर्वदा दु:खांची चिंता आणि देहबुद्धीला हवंहवंस वाटणारं सुख याचीच प्रीती का? हे सारे प्रश्न हा दहावा श्लोक विचारतो आणि मग या देहदु:खाच्या मूळ कारणांकडे नेत त्या देहदु:खांना कसं सामोरं जावं, हे सुचवितो! त्यासाठी या श्लोकाच्या प्रत्येक चरणाचा मननार्थ खोलात जाणून घेतला पाहिजे. या दहाव्या श्लोकाचे सुरुवातीचे दोन चरण असे आहेत.. सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी। दु:खाची स्वयें सांडि जीवीं करावी।। यातला प्रत्येक शब्द फार सूचक आणि अर्थवाहक आहे. पहिल्या चरणात काय धरायचं ते सांगितलं आहे आणि दुसऱ्या चरणात काय सोडायचं, काय सांडायचं ते सांगितलं आहे! या दोन्ही चरणांच्या गूढार्थाची दुसरी छटाही आहे. ती जाणून घेण्याआधी सरळ मार्गानं मननार्थ काय, तेदेखील पाहू. पहिला चरण सदा सर्वदा रामाची प्रीती धरायला सांगतो आणि दुसरा चरण हा त्या प्रेमाआड येणारं दु:ख सोडून द्यायला सांगतो. समर्थानी चौदा ओवीशतांमध्ये म्हटलं आहे की, ‘‘सांडूनिया दृश्य आणि मनोभास। मग जगदीश वोळखावा।।’’ दृश्य आणि मनोभास सोडायला समर्थ सांगतात. इतकंच नव्हे, तर जोवर दृश्य आणि मनोभास सोडला जात नाही, तोवर जगदीशाची ओळख होऊ शकत नाही, असंही सांगतात. आपल्याला वाटतं, मनोभास म्हणजे मनाला होणारे भास-आभास हे काल्पनिकच असले पाहिजेत. त्यामुळे ते सोडायलाच हवेत. पण दृश्य? जे दिसतं ते खरंच तर असतं. त्यावर विश्वास पटकन आणि दृढपणे बसतो. हे दोन्हीही कसं सोडायचं. त्यातही दृश्य कसं सोडता येईल आणि ते व्यवहार्य तरी आहे का? तर इथं दृश्य म्हणजे दृश्याचा प्रभाव! दृश्य म्हणजे निव्वळ दिसणारं नाही. आपल्याला अनंत गोष्टी एकाच क्षणी दिसत असतात, पण आपण त्यातलं तेवढंच पाहात असतो जे आपल्याला आकर्षित करतं, भावतं, हवंसं वाटतं. तेव्हा दृश्याचं आपलं आकलनही समग्र नसतं. मग जे आकर्षित करतं, भावतं, हवंसं वाटतं त्यात आंतरिक मोह आणि लोभाचाच तर वाटा असतो ना? बरं, आता असा प्रश्न येईल की, युद्धाची दृश्यही आपण पाहातो. एखाद्या अतिरेकी हल्ल्याचेही आपण साक्षीदार असतो. त्या गोष्टी कुठे हव्याशा, आकर्षित करणाऱ्या किंवा भावणाऱ्या असतात? प्रश्न बरोबर आहे, पण सुदूर देशातल्या अतिरेकी हल्ल्यांकडे आपण कसे पाहातो आणि आपल्या जवळच्या प्रांतातल्या हल्ल्यांकडे कसं पाहातो, याचाही विचार करा. माझ्या जवळ जे काही अस्वस्थ करणारं घडतं, त्याची मला चिंता वाटते. कारण उद्या त्याच्या झळा माझ्या घरापर्यंत, माझ्या माणसांपर्यंत पोहोचण्याची काळजी असते. दूर घडलेल्या घातपातानं आपण हळहळतो, पण त्याची चिंता वा काळजी तेवढी तीव्र नसते. म्हणजेच दृश्याचा प्रभाव हा व्यक्तिकेंद्रित किंवा अचूकतेनं सांगायचं तर ‘मी’केंद्रित आणि ‘मी’ सापेक्षच असतो. तो ‘मी’ आणि ‘माझे’शी जखडला असतो. जोवर दृश्याचा प्रभाव व्यापक असतो, तोवर व्यापक आणि अदृश्य अशा परमतत्त्वाकडे मला वळताच येत नाही. मग त्याचा प्रभाव पडणं, ही तर दूरची गोष्ट झाली!

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2016 4:05 am

Web Title: manobodha tenth stanza
Next Stories
1 ७०. दशा आणि दिशा..
2 ६९. आकाशझेप
3 ६८. महादु:ख
Just Now!
X