नको रे मना क्रोध हा खेदकारी! क्रोध हा मनाला खेदाच्या खाईत ढकलणारा आहे. या क्रोधाची व्याप्ती फार मोठी आहे. क्रोध आणि भय या माणसाच्या दोन उपजत मनोभावना आहेत. त्यांचं बीज माणसाच्या मेंदूतच असतं. ‘भाविदडी’त मानसशास्त्राच्या अंगानं या भयाचा आणि क्रोधाचा विचार केला होता. थोडा विचार केला की आपल्याही लक्षात येईल की, कोणतीही मनोभावना उत्पन्न झाली की काही आंतरिक बदल निश्चितच घडतात. हे बदल देहाच्या पातळीवरही असतात. मनोभावना उसळताच शरीरही त्या भावनेला पूरक अशी, अनुरूप अशी स्वयंसज्जता निर्माण करतं. भय आणि क्रोध या दोन्ही मनोवेगांच्या वेळी शरीरात जे बदल घडतात त्यात साम्य असतं. क्रोधाविष्ट माणसाचा चेहरा पालटतो आणि त्याच्या डोळ्यांतूनही क्रोध फाकत असतो, हे तर दिसतंच. त्याबरोबरच आत काय क्रिया घडते? माणूस क्रोधायमान होतो तेव्हा त्याच्या हृदयाचे ठोके जलद पडू लागतात. स्नायूंमधल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावू लागतात. यकृतात साठलेली साखर बाहेर पडू लागते. काही अंतस्र्रावी ग्रंथींमधील प्रथिनयुक्त घटकांचं प्रमाण वेगानं वाढू लागतं. स्नायूंमधील रक्तवाहिन्या प्रसरण पावत असतानाच त्वचेवरील रक्तवाहिन्या मात्र आकुंचन पावत असतात! काय योजना आहे पाहा! क्रोधाच्या क्षणी मेंदूला निर्णय फार वेगानं घ्यावा लागतो त्यामुळे यकृतातील साखर मेंदूकडे, तर कृतीसाठी स्नायूंना तात्काळ बळ मिळावं यासाठी रक्तपुरवठा स्नायूंकडे सुरू होतो. स्नायूंना रक्तपुरवठा वेगानं सुरू राहावा म्हणून स्नायूंमधील रक्तवाहिन्या प्रसरण पावत असतानाच जर क्रोधाच्या क्षणी शरीरावर आघात झालाच तर रक्तस्त्राव कमी व्हावा, यासाठी त्वचेवरील रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात! भय आणि क्रोध या दोन्ही मनोवेगांच्या वेळी शरीर अशी विलक्षण सज्जता बाळगतं! आता विचार करा, खऱ्या अटीतटीच्या क्षणासाठी ही जी एवढी आंतरिक तयारी, सज्जता शरीर वेगानं निर्माण करतं ती सदोदित करण्याची पाळी शरीरावर ओढवली तर काय होईल? कितीही झालं तरी शरीराच्या क्षमतांनाही मर्यादा आहेच. त्यांच्यावर सदोदितचा ताण निर्माण करणं म्हणजे त्या सज्जतेच्या प्रक्रियेलाच क्षीण करणं आहे. त्याचा शरीरावरही विपरीत परिणाम होऊ लागेल, यातही शंका नाही. म्हणूनच सदोदित क्रोधायमान होणं, ही स्थिती देहाच्या दृष्टीनंही चांगली नाही. त्यासाठीच अध्यात्मही क्रोधावर ताबा मिळवायला सांगतं. समर्थही म्हणतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी! ‘आचरण योग’ या ग्रंथात या क्रोधाचे चार प्रकार य. श्री. ताम्हनकर यांनी सांगितले आहेत. शीघ्रकोपी, दीर्घकोपी, बलहीनकोपी आणि सुप्तकोपी, असे ते चार प्रकार आहेत. राग उसळायला ज्यांना क्षुल्लक कारणही पुरतं ते शीघ्रकोपी, पण हे लोक बरे कारण त्यांचा राग जसा क्षणार्धात उसळतो तसाच वेगानं शांतही होतो. मनात मळमळ साचत नाही. अर्थात सतत रागावणं हे चांगलं नव्हेच! दीर्घकोपी हे वारंवार रागावत नाहीत, पण एकदा रागावले की त्यांचा राग प्रदीर्घ काळ टिकतो आणि त्यांच्या मनोवृत्तीवरही परिणाम करतो. देहाच्या दृष्टीनं अशक्त असलेले, बलहीनकोपी या गटात मोडतात. ते आपला राग दुसऱ्यावर काढू शकत नाहीत, म्हणून स्वत:वरच काढतात. स्वत:ला मारून घेतात. काही आपल्यापेक्षा बलहीन असलेल्यांवर हा राग काढतात. सुप्तकोपी हे एखाद्या ज्वालामुखीसारखे थंड असतात. त्यांचा राग त्यांच्या चेहऱ्यावरून किंवा आचरणातून जाणवतही नाही. ज्वालामुखी जसा अचानक उसळावा आणि सर्व भवताल त्यात बेचिराख होत जावा तसा यांच्या अंतर्मनातला खदखदता राग अचानक उफाळतो आणि इतरांबरोबरच स्वत:चाही घात करतो. आपण या चारपैकी कोणत्या गटात आहोत?

– चैतन्य प्रेम

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…