अयोध्या म्हणजे युद्धातजिंकली न जाणारी.. अजिंक्य, अभेद्य, अयोध्य! श्रीसद्गुरूंच्या बोधानुरूप वाटचाल करणाऱ्या साधकाचं अंतरंगही असंच अजिंक्य, अभेद्य आणि अयोध्य होतं. जगातील द्वंद्वाचा प्रभाव त्यावर पडू शकत नाही. जगातील चढउतारांनी त्याच्या धारणेत बदल होत नाही. ‘श्रीसद्गुरू केवळ माझे आहेत आणि मी केवळ श्रीसद्गुरूंचा आहे,’ ही एकमात्र धारणा ज्याची पक्की झाली, त्याचं अंतरंग हे अशी ‘अयोध्या’ आहे. मग तो आध्यात्मिक प्रगतीत उच्च पातळीवर असो की कनिष्ठ पातळीवर असो, तो या ‘सर्वा’तलाच अभिन्न घटक आहे! तेव्हा आपलं अंतरंगदेखील अशी अयोध्या झालं पाहिजे. असं हृदय हीच खरी ‘रामजन्मभूमी’ आहे आणि तिच्या दुर्दशेचं भान मात्र कुणालाच नाही.. तर श्रीसद्गुरूंच्या अवतारसमाप्तीनंतरही या ‘अयोध्ये’त त्यांचा प्रत्येक भक्त त्यांच्या सान्निध्यात अविरत नांदत असतो. जगातले व्यवहार करीत असतानाही तो त्यांच्यापासून कधीच विभक्त नसतो. आता ‘सर्व’ची दुसरी अर्थछटा पाहू. आपण गेल्याच भागात पाहिलं की, अवतार समाप्तीच्यावेळी प्रभुंनी अयोध्येतील सर्वच जीवमात्रांना परमधामी नेलं. अनिवार्यता एकच होती ती म्हणजे त्यानं अयोध्येत मात्र असलं पाहिजे. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणाले होते की, ‘‘काशीला जाणाऱ्या गाडीत अनेकजण असतात. त्यात तिकिट काढलेले प्रवासी जसे असतात तसेच तिकिट न काढलेलेही असतात. त्यांच्याचबरोबर साधू, संन्यासी इतकेच नव्हे तर भिकारी आणि भुरटे चोरदेखील असतात. हे सारेच काशीला पोहोचतात, अट एकच की कुणीही गाडी मात्र सोडता कामा नये!’’ अगदी त्याचप्रमाणे जो सद्गुरू मार्गात पडून आहे, मग तो या घडीला कसाही का असेना, त्याचा प्रवास मुक्कामाच्या दिशेनंच अविरत सुरू राहील आणि तो आज ना उद्या मुक्कामाला पोहोचेलही!

आता ‘‘पुरी वाहिली तेणें सर्व विमानीं।’’ या चरणातील ‘विमान’ या रूपकाचा थोडा विचार करू. श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या ‘हृद्य आठवणी’ लिहिणारे बापूसाहेब मराठे यांची सहा पुस्तके अलिकडेच प्रसिद्ध झाली आहेत. त्यात ‘विमान’ या रूपकाचा फार मार्मिक उलगडा आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे, या पृथ्वीवरील यच्चयावत वस्तूमात्रांना गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू आहे. येथे वर भिरकावलेली प्रत्येक गोष्ट खाली पडल्याशिवाय राहात नाही. पण याच पृथ्वीवरील वस्तू, उपकरणं, यंत्रं यांच्याद्वारे बनविलेले विमान हे उंच आकाशात झेपावतं. अर्थात तेवढय़ापुरतं ते गुरुत्वाकर्षण शक्तीवर मात करतं! अगदी त्याचप्रमाणे माणूस हा स्वाभाविकपणे विकार आणि वासनांत जखडलेला असतो. त्याचा जन्मच वासनेत असल्यामुळे या वासनेतून तो अखेपर्यंत बाहेर पडू शकत नाही आणि माणसाची स्वाभाविक खेच, ओढ ही विकार -वासनांकडेच असते. आपण याच चर्चेच्या अनुषंगानं आधी पाहिल्याप्रमाणे, देहगत वा शारीर वासनादेखील स्वाभाविकच असल्या तरी ज्याला भौतिकातही काही उत्तुंग यश साधायचं आहे त्यालादेखील आपल्या वासनांवर, कामनांवर, इच्छांवर ताबा मिळवावा लागतो, त्यांचं नियमन आणि नियंत्रण करावं लागतं. मग आध्यात्मिक वाटचालीत साधकाला हा अभ्यास करावा लागतो, यात आश्चर्य ते काय? आणि म्हणूनच पृथ्वीवरील वस्तूंपासून बनवलेले विमान जसं गुरुत्वाकर्षण शक्तीवर मात करीत आकाशात झेपावतं त्याचप्रमाणे विकार-वासनांच्या भूमीवरून साधकाचं अंत:करणही आंतरिक शक्तीच्याच जोरावर  हृदयाकाशात स्थिर होतं!  अर्थात, विमानात काही बिघाड झाला तर ते कोसळतं, त्याप्रमाणे भल्याभल्या साधकाच्या धारणेत काही बिघाड झाल्यास घसरण ठरलेलीच असते.

-चैतन्य प्रेम