सद्गुरूंच्या स्मरणात व्यवहार करताना त्या व्यवहाराचा प्रभाव मनावर पडणं कमी होऊ लागतं. व्यवहारातल्या चढउतारांनी मनाची तोवर होणारी घालमेल कमी होऊ लागते. याचा अर्थ माणूस व्यवहारात चुकतो आणि बेफिकीर होतो, असा नव्हे. उलट व्यवहारात जिथे जे प्रयत्न करायला हवेत ते पूर्ण सक्षमतेनं करूनही त्या व्यवहाराला जीवनात जितकं महत्त्व आहे तितपतच ते तो देतो. त्यामुळे व्यवहार करतानाही चित्तातून सद्गुरूंचं माहात्म्य तसूभरही कमी होत नाही. त्यामुळे असा व्यवहार हा देखील त्यांचंच भजन होतो आणि तो तसंच समाधान देतो. हा भाव किंचितदेखील कमी झाला तरी तेवढं समाधान आपल्यापासून दुरावतं आणि एकदा हा आंतरिक भाव कमी होऊ लागला तर मन विकल्पाच्या जंजाळात फसून भाव झपाटय़ानं ओसरत नष्ट व्हायला वेळ लागत नाही. म्हणूनच समर्थ दासबोधात सांगतात, ‘‘जैसें जयाचें भजन। तैसेंचि दे समाधान। भाव होतां किंचित् न्यून। आपणहि दुरावे।।’’  आणि मनोबोधाच्या ३५वा श्लोकही सांगतो की, ‘‘असे हो जया अंतरीं भाव जैसा। वसे हो तया अंतरीं देव तैसा।’’ या इथं ‘देव’ हा शब्दही मोठा मार्मिक आहे. ‘देव’ म्हणजे देणारा.. मग समर्थ सांगतात तुमच्या अंत:करणात जसा भाव असेल तशी मनोदशा तो तुम्हाला देईल! संशयी, नकारात्मक, विपरीत असा  भाव जर अंत:करणात असेल तर तो तशीच मनोदशा वाटय़ाला आणील. हाच भाव जर निश्चयात्मक, सकारात्मक आणि सद्गुरू समर्पित असेल तर अंत:करणात दृढ, सकारात्मक आणि ऐक्यमय मनोदशाच विलसू लागेल. मग जो अनन्य आहे.. ज्याला सद्गुरुंशिवाय जगण्याचा दुसरा विषय नाही, अशी ज्याची अवस्था आहे अशा अनन्य भक्ताच्या अनन्य भावाचं रक्षणही तो चापपाणीच करील! अंत:करणातली ती अनन्यताच त्याला सदा आत्मतृप्त  करील. समर्थभक्त ल. रा. पांगारकर यांनी या श्लोकाच्या विवरणात रामायणातील युद्धकांडावरचा समर्थाचा एक श्लोक नमूद केला आहे. हा श्लोक असा : ‘जया अंतरीं भाव होईल जैसा। तयालागिं तो देव पावेल तैसा।। यदर्थी कदा संशयोही असेना। अभावें तरी देव तो पालटेना।।’’ यातला पहिला चरण तर समजतोच की, ज्याच्या अंतरंगात जसा भाव होईल तसा देव त्याला पावेल, पण पुढचा चरण चकवा देतो. यात समर्थ म्हणतात, ज्याच्या अंतरंगात जसा भाव आहे तसा देव पावतोच, पण अभावानं देव काही पालटत नाही! आता आपण जो ३५वा श्लोक पाहात आहोत आणि त्याच्या पुष्टय़र्थ हा श्लोकही पाहात आहोत त्यातला ‘देव’ म्हणजे सद्गुरूच आहे. त्याचा उलगडा या सदराच्या उत्तरार्धात होणार आहेच. तर या अखेरच्या चरणाचं खोलवर मनन केलं की जाणवेल, समर्थ सांगत आहेत की देव पालटायला हवा असेल तर तो अभावानं नव्हे, तर केवळ भावानंच पालटेल! देवात कोणता पालट हवा आहे हो? तर तो सर्वत्र असूनही दिसत नाही.. त्याचं अस्तित्व सर्वकाळी सर्वत्र असूनही त्याची अस्तित्वभावना खरेपणानं होत नाही, तो सर्वसमर्थ असूनही त्याच्या आधाराचा खरा अनुभव येत नाही.. हे जे चित्र आहे ते पालटायला हवं आहे! सर्वत्र असूनही त्याचं न दिसणं पालटायला हवं आहे, सर्वत्र सर्वकाळी असूनही त्याचं अस्तित्व न जाणवणं पालटायला हवं आहे.. सर्वशक्तीमान असूनही त्याचा आधार न जाणवणं पालटायला हवं आहे! खोल विचार केला की जाणवेल, त्यासाठी पालट देवात नव्हे, तर आपल्या अभावग्रस्त अंत:करणातच व्हायला हवा आहे! आणि तो भाव शुद्धीशिवाय अशक्यच. जर अंत:करणात त्याच्याविषयी दृढ, शुद्ध, एकनिष्ठ भाव झाला तरच त्याचं अस्तित्व, सामथ्र्य, सार्वत्रिकता पदोपदी जाणवू लागेल. पण त्याआधी एक नाजूक वळणही येईल. मनोबोधाचा ३६वा श्लोक त्या वळणावरच नेतो!

-चैतन्य प्रेम

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…