12 August 2020

News Flash

७२. दृश्य.. अदृश्य

जोवर दृश्याचा प्रभाव मनावर आहे, तोवर अदृश्य अशा परमतत्त्वाची जाणीव होऊच शकणार नाही.

जोवर दृश्याचा प्रभाव मनावर आहे, तोवर अदृश्य अशा परमतत्त्वाची जाणीव होऊच शकणार नाही. ती किंचितशी झाली तरी, टिकणार नाही. दृश्यच जोवर पूर्णत्वानं खरं वाटतं, तोवर अदृश्य खोटंच किंवा काल्पनिकच वाटणार! त्यामुळे अदृश्य अशा परमतत्त्वाच्या प्राप्तीच्या मार्गावर जिवांना अग्रेसर करण्यासाठी श्रीसद्गुरू दृश्य रूपातच प्रकटले! समर्थ ‘दासबोधा’त म्हणतात, ‘‘प्रगट तें जाणावें असार। आणी गुप्त तें जाणावें सार। गुरुमुखें हा विचार। उमजों लागे।।’’ (दशक ६, समास २, ओवी २१). जे प्रगट आहे, जे दृश्य आहे त्यात खरं सार नाही. ते सतत सरणारं, ओसरणारं आहे. म्हणूनच त्याला संसार म्हणतात! जे प्रगट आहे ते काळाच्या पकडीत आहे. त्यात घट, झीज, बदल, हानी, नाश झाल्याशिवाय राहाणारच नाही. थोडक्यात ते सारं अशाश्वत आहे. त्याची शाश्वती देता येत नाही. ज्या देहाच्या आधारावर मी जगतो, जगात वावरतो, त्या देहाचीच शाश्वती देता येत नाही. मग त्या देहाच्या जोरावर मी जे जे काही मिळवतो, टिकवतो, निर्माण करतो, सांभाळतो, जपतो त्याची तरी शाश्वती कुठली? तेव्हा हे सारं अशाश्वतच असणार. तरी त्या अशाश्वताचा अतूट प्रभाव माझ्यावर असतो आणि त्यामुळेच मला शाश्वत परमतत्त्वाची गोडी लागत नाही. ती मला लावण्यासाठीच तर निराकार, निर्विकार सद्गुरू आकारात प्रकटले. ‘सदा सर्वदा प्रीती रामी’ कशी धरावी, हे त्यांनीच तर बिंबवलं! आता हा ‘राम’ म्हणजे सत्, शाश्वत, पूर्ण! माझं जगणं मात्र असत्, अशाश्वत आणि अपूर्णतेनं भरून आहे. त्यामुळे जगताना त्या असत्, अशाश्वत आणि अपूर्णाचीच ओढ आहे. त्याचंच ममत्व आहे. त्याचीच प्रीती आहे. त्याच्याच जपणुकीची तळमळ आहे. अशाश्वताच्या प्रीतीत अशा रीतीनं रूतलेल्या मला सत्चं, शाश्वताचं, पूर्णत्वाचं प्रेम जडू तरी शकेल का? त्यामुळे ते प्रेम माझ्या मनात उत्पन्न करण्यासाठी सद्गुरूंनी त्यांच्या आचरणातून शाश्वताची अखंड भक्ती कशी साधावी आणि अशाश्वतापासून मनानं कसं विभक्त व्हावं, हे सदोदित, सदा सर्वदा बिंबवलं! श्रीसद्गुरूंच्या ‘श्रीगुरूचालिसा’मध्ये एक चौपाई आहे. तिचा पहिला चरण असा – ‘‘स्वयं मूल बपु बनि जिमि दासा।। भगति रीती निज करत प्रकासा।।’’ म्हणजे स्वत: मूळ परमतत्त्वच असूनही परमात्म्याचा दास म्हणून श्रीसद्गुरू जगात वावरतात आणि भगवंताची भक्ती करीत राहून, सद्गुरूंची अनन्य भक्ती जिवांनी कशी करावी, याचाच प्रत्यक्ष पाठ देतात! आता सदासर्वदा रामांची म्हणजे शाश्वताची प्रीती कशी धरावी? तर जो त्या रामात, शाश्वतात, सत्मध्ये पूर्ण विलीन आहे, अशा सद्गुरूंच्या बोधानुरूप जगूनच ती प्रीती धरता येणार! समर्थ रामाची प्रीती ‘धरायला’ सांगत आहेत. आपण एखादा नेम धरतो, एखादं व्रत धरतो, एखादा उपवास धरतो. तसं रामाचं, शाश्वताचं प्रेम धरायचं आहे! शाश्वताचं प्रेम धरायचं म्हणजे धारण करायचं, जे सत् आहे त्याचीच धारणा सदोदित टिकवायचा प्रयत्न करायचा. त्या पूर्णाचाच आधार घ्यायचा. त्याच्याच भावधाराप्रवाहात अखंड राहायचं. जर असत्चीच धारणा असेल तर सत्ला धरताच येणार नाही आणि माझं अंत:करण ज्या ज्या अशाश्वत, असत्च्या जाळ्यात अडकून आहे ते सद्गुरूच मला दाखवतात आणि त्यातून सुटण्याची शक्तीही देतात. जोवर अशा असत्च्या खोडय़ांतून मी सुटत नाही, तोवर सत्ची प्रीती लागूच शकत नाही. शाश्वताचं प्रेम धरायचं असेल तर अशाश्वताचं प्रेम सोडावंच लागेल. म्हणूनच समर्थ सांगतात, सदा सर्वदा रामाची प्रीती धरायची, तर स्वत:हून दु:खाचं ओझं दूर केलं पाहिजे. कारण त्या दु:खाची मूळं अशाश्वतालाच धरून आहेत!

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2016 3:15 am

Web Title: samarth ramdas philosophy 6
Next Stories
1 ७१. दृश्यप्रभाव
2 ७०. दशा आणि दिशा..
3 ६९. आकाशझेप
Just Now!
X