News Flash

१७९. कल्पने किं दरिद्रता?

ज्या परिस्थितीवर मी अवलंबून असतो ती परिस्थिती किती अनिश्चित असते, हे जीवन दाखवत असतं.

 

संस्कृत भाषेतली प्रसिद्ध म्हण आहे, ‘कल्पने किं दरिद्रता’! कल्पनाच करायची तर त्यात कल्पनादारिद्रय़  कशाला? अध्यात्म मार्गावरचा पायाच या वचनात आहे. ‘मी देह आहे’ ही संकुचित कल्पनाच का करता? ‘अहं ब्रह्मास्मि’ हीच भव्य कल्पना का स्वीकारत नाही? संत सांगतात की बाबा रे तू राजा आहेस.. राजयाची कांता काय भिक मागे, असा सवाल संतच विचारतात.. तू राजा असताना अमुक हवं, तमुक हवं अशी सदोदित भीक का मागत राहातोस? पण ते पटावं कसं? तर निसर्गदत्त महाराजांच्या शब्दांत सांगायचं तर आधी राजा असल्यासारखं वागून तर पाहू! श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणतात ना? कारणाचा आनंद हा कारणापुरता टिकतो! म्हणजे अमुक एक व्यक्तीच माझ्या आनंदाचं कारण आहे, असं मी मानत असेन तर त्या व्यक्तीच्या असण्या-नसण्यावर एवढंच नव्हे त्यानं माझ्या मनासारखं वागण्या-न वागण्यावर माझं सुख अवलंबून राहाणार! अगदी त्याचप्रमाणे अमुक परिस्थिती असेल, तरच मी सुखी राहीन, असं मी मानत असेन किंवा अमुक वस्तू असतील तरच मी सुखी राहीन, असं मानत असेन तर त्या परिस्थितीच्या अनुकूलतेवर-प्रतिकूलतेवर, त्या वस्तूंच्या असण्या-नसण्यावर माझं सुख अवलंबून राहील. मग खरं सुख या सर्वापलीकडे आहे, खऱ्या शाश्वत सुखाला या अशाश्वत जगातल्या कोणत्याच आधाराची गरज नाही, हे सद्गुरू सांगतात तेव्हा निदान या सर्व आधारांतून सुख शोधायचा प्रयत्न थांबविण्याचा अभ्यास मी का करू नये? माझ्या सर्व सुखाचा, पूर्ण सुखाचा आधार केवळ सद्गुरूच आहेत, याची जाण ठेवून मी सद्गुरूमयता हेच जीवनाचं लक्ष्य का ठरवू नये? देहतादात्म्यात अनंत जन्म सरले निदान हा जन्म सद्गुरूतादात्म्यासाठी आहे, असं का मानू नये? अखेरच्या श्वासापर्यंत याच सद्गुरूमयतेसाठी अभ्यास करायचा आहे, असं मानून हा अवघा जन्म साधनेसाठीच आहे, असं का मानू नये? तेव्हा जीवनाचं खरं लक्ष्य हे खरी सुखप्राप्ती असेल तर अशाश्वत, संकुचित, खंडित आधारांवर शाश्वत, व्यापक, अखंड सुख लाभणार नाही, हे लक्षात घेऊन जो शाश्वत, अखंड परमतत्त्वाशी सदैव एकरूप आहे, अशा खऱ्या सद्गुरूंच्या बोधानुरूप जगणं, हेच जीवनाचं लक्ष्य का ठरवू नये? आणि एकदा का हे लक्ष्य ठरलं तर मग अत्यंत आदरानं त्याचा पाठपुरावा करीत राहीलं पाहिजे. समजा एखादा सदोदित म्हणत असेल की शरीरसौष्ठव स्पर्धेत जिंकणं हे त्याच्या जीवनाचं लक्ष्य आहे आणि त्याचवेळी व्यायाम करीत नसेल, खाण्यापिण्यात बेतालपणा असेल, त्यामुळे पोट सुटलं आहे, स्थूलता वाढली आहे तर मग नुसतं तोंडानं ‘शरीर कमावणं हेच माझ्या जीवनाचं लक्ष्य आहे,’ असं म्हणून काय उपयोग? तेव्हा जे काही लक्ष्य आहे त्याबद्दल आदर हवा, सगळं जगणं त्याभोवतीच केंद्रित हवं, त्या लक्ष्याचंच जगताना सतत अनुसंधान हवं, जगण्यातून त्या लक्ष्याला विसंगत असं सारं काही बाद व्हावं यासाठीच सर्व प्रयत्न व्हावेत. असं असेल तरच त्या लक्ष्याबद्दल आदर आहे आणि त्याकडे खरं लक्ष आहे, असं म्हणता येईल! आणि प्रत्येकाला जीवनच खूप काही शिकवत असतं पाहा. अशाश्वत अशा गोष्टींत रमून मी पदोपदी दु:ख भोगत असतानाही जीवन मला अशाश्वत गोष्टींत रमण्यातले धोके दाखवून देत असतं.  ज्या परिस्थितीवर मी अवलंबून असतो ती परिस्थिती किती अनिश्चित असते, हे जीवन दाखवत असतं. ज्या माणसांना मी माझं सर्वस्व मानतो त्या माणसांचं खरं रूपही हे जीवनच दाखवतं. माझ्या सुखाच्या आधारातला तकलादूपणा, माझ्या मनातले भ्रम, माझ्या आसक्ती आणि दुराग्रहापायी मलाच होणारा त्रास, हे सारं सारं माझं जीवन मला दाखवत असतं. तरीही मी खऱ्या अर्थानं शिकत नाही. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात ना? ‘अनुभव दु:खाचा असला तरी सुटत नाही हीच माया!’ तेव्हा मायेत रमणं थांबत नाही, संकुचित कल्पनांनी त्या मायेभोवती फेर धरणं थांबत नाही आणि मग त्यामुळेच दु:खाच्या फेऱ्यात अडकणं चुकत नाही! अंत:करणातल्या संकुचित कल्पनांमध्ये पालट हाच यावरचा एकमेव उपाय आहे!

-चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2016 3:11 am

Web Title: samarth ramdas philosophy 79
Next Stories
1 १७८. कल्पना प्रवाह
2 १७७. लक्ष्य
3 १७६. सूत्र-बोध
Just Now!
X