जे शाश्वत, अखंड, परम अशा तत्त्वाशी सदा एकरूप आहेत त्यांचा सर्व बोधही शाश्वताशीच जोडलेला असणार ना? त्याच बोधानुरूप जगणं, हाच जीवनाचा खरा आधार ठरणार ना? तेव्हा समर्थ सांगतात, ‘हे मना, केवळ श्रीसद्गुरूंचा आधार, त्यांच्या बोधानुरूप जगणं हेच खरं सुखाचं आहे (मना पाविजे सर्वही सूख जेथें).  तेव्हा हे मना, सुखप्राप्ती हेच जर तुझ्या जीवनाचं खरं लक्ष्य असेल, तर हे सर्व सुख जिथून प्राप्त होतं त्या श्रीसद्गुरूंच्या जाणिवेनं व्यापून जाणं हेच जीवनाचं खरं लक्ष्य ठेव आणि अत्यंत आदरानं त्या लक्ष्यानुरूप जगत आहोत की नाही, याकडे लक्ष ठेव (अतीआदरें ठेविजे लक्ष्य तेथें). या घडीला देहतादात्म्याचा आधार हा वास्तविक वाटत असतो तर श्रीसद्गुरुमयतेनं जगणं हे काल्पनिक भासत असतं. ‘देहच मी’ ही खोलवर रुजलेली संकुचित कल्पना विवेकपूर्वक पालटायला हवी (विवेकें कुडी कल्पना पालटीजे). त्यासाठी हे मना सदैव सत्संगात आणि त्यायोगे व्यापक सद्गुरुजाणिवेत चिंतन, मनन आणि निदिध्यासपूर्वक राहण्याचा प्रयत्न कर (मना सज्जना राघवीं वस्ति कीजे।।). तर अंतरंगातली संकुचित कल्पना पालटायला हवी असेल तर त्यासाठी व्यापक कल्पना रुजवायला हवी आणि त्यासाठीच विवेकाचा आधार हवा. आता आपल्याला वाटेल की, कल्पना संकुचित असो किंवा व्यापक असो; शेवटी कल्पना ती कल्पनाच ना? मग जिथं कल्पना आहे, कल्पनेचा स्वीकार आहे तिथं विवेक उरेलच कसा? समर्थानी ‘दासबोधा’च्या सातव्या दशकातील ‘द्वैतकल्पनानिरसन’ या पाचव्या समासात म्हटलं आहे, ‘कल्पना माया निवारी। कल्पना ब्रह्मथावरी। संशय धरी आणी वारी। ते हि कल्पना।।’ कल्पनेनंच मायेला निवारा मिळतो आणि कल्पनेनंच मायेचं निवारण होतं! कल्पनेनंच ब्रह्मभावात स्थिर होता येतं. कारण कल्पनेनंच माणसाच्या मनात संशय येतो आणि कल्पनेनंच तो सुटतो! ‘कल्पना करी बंधन। कल्पना दे समाधान। ब्रह्मीं लावी अनुसंधान। ते हि कल्पना।।’ कल्पनाच बंधन निर्माण करते आणि कल्पनाच समाधान मिळवून देते. इतकंच नाही तर ब्रह्मीं म्हणजे सद्गुरुतत्त्वात प्रथम अनुसंधान कल्पनेनंच होतं. मग समर्थ जे पुढे सांगतात ते फार महत्त्वाचं आहे.. समर्थ सांगतात, ‘कल्पनेनें कल्पना सरे। ऐसी जाणावी चतुरें। सबळे गेलियां नंतरें। शुद्ध उरली।।’ कल्पनेनंच कल्पना सरते. प्रथम ‘मी त्यांचाच आहे’ या कल्पनेच्या स्मरणानं ‘देहच मी’ ही अहंयुक्त कल्पना मावळू लागते. कल्पनेनंच कल्पना नष्ट होते, हे चतुर म्हणजे युक्तीनं कठीण गोष्ट सहजसाध्य करणारे जाणतात. मग भ्रामक कल्पना सबळ गेली की व्यापक कल्पनाही ‘कल्पना’ म्हणून उरत नाही, तर केवळ शुद्ध अनुभवरूपात परिवर्तित होऊन ती उरते! तेव्हा विवेकपूर्वक कल्पना पालटणं, म्हणजे या घडीला ‘मी त्यांचाच आहे’ ही या घडीला पूर्ण सत्य न भासणारी कल्पना दृढपणे धारण करणं! हाच या घडीला ‘विवेक’ आहे! पू. बाबा बेलसरे ‘सार्थ दासबोधा’च्या विवरणात म्हणतात, ‘मन कल्पनाप्रधान असल्याने कल्पनांची रचना व तऱ्हा बदलली की मन बदलते! मन बदलले की माणूस अंतरंगातूनही बदलतो. ‘मी देहच आहे’ ही कल्पना नष्ट करण्यास ‘मी आत्माच आहे’ ही कल्पना करायची. पहिल्या कल्पनेने द्वैताने भरलेले दृश्य विश्व खरे वाटते. दुसरी कल्पना साधनेने सुदृढ केली तर तेच दृश्य खरे न वाटता अद्वैत ब्रह्म खरे वाटते.’ तेव्हा संकुचित कल्पना बदलण्यासाठी मूळ कल्पनेबद्दलच शंका घेतली पाहिजे! जे मनोनिर्मित असेल त्याचा नाश मनानेच केला पाहिजे.’  जग खरंच अखंड सुखाचा आधार आहे का, अशी शंका मनात आली तरच जगापलीकडे सुख मिळविण्याचा विचार मनाला शिवेल. जग काळात आबद्ध आहे आणि काळाच्या चौकटीत जखडलेल्या प्रत्येक वस्तुमात्राला घट, बदल, झीज, हानी हे काळाचे सर्व नियम लागू होतात. त्यामुळे या अशाश्वत काळाच्या आधारावर शाश्वत सुख मिळविण्याची माझी कल्पनाच चुकीची आहे. ती सोडायची तर जो कालातीत आहे, जगात असूनही जगातल्या भय, काळजी, चिंतांच्या अतीत या दृष्टीनं जगातीत आहे अशा श्रीसद्गुरूंचाच आधार मी घेतला पाहिजे. मनोबोधाच्या ४०व्या श्लोकाचं विवरण इथं संपलं. आता खऱ्या सुखाचा आधार सद्गुरूच आहेत, जग नव्हे, हे ठासून सांगताना समर्थ मनोबोधाच्या ४१व्या श्लोकात म्हणतात, ‘‘बहू हिंडतां सौख्य होणार नाही!’’

-चैतन्य प्रेम

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Mahavitaran Jobs
Mahavitaran Jobs : महावितरण मध्ये नोकरीची संधी! ५३४७ रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : वंचित नव्हे, मविआच भाजपची ‘बी टीम’?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…